Rajapur Vidhan Sabha constituency: कोकणातील राजापूर विधानसभा मतदारसंघाची (Rajapur Vidhan Sabha constituency) लढत ही यंदा बरीच चुरशीची होणार आहे. कारण यंदा या विधानसभेत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळणार आहे.  राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे थोरले बंधू किरण सामंत (Kiran Samant) पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना ठाकरे गटाकडून राजन साळवींचं (Rajan Salvi) आव्हान आहे.  त्यामुळे सामंत यांच्यासाठी देखील ही लढाई प्रतिष्ठेची झालीये. पण शिवसेना विरूद्ध शिवसेना लढतीत नेमकं कुणाचं पारडं जड? कायम पडद्याआड राहिलेल्या किरण सामंत यांच्यासाठी लढाई किती महत्त्वाची? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. 


 कोकणातील राजापूर विधानसभा मतदारसंघातील लढाई ही रंगतदार आणि रंजक आहे. कारण सलग तीन वेळा विजयी झालेले, ठाकरेंचे शिलेदार असलेले राजन साळवींसमोर आता किरण सामंत यांचं आव्हान आहे. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनी कधी ग्रामपंचायतीचीही निवडणूक लढवली नव्हती. पण पण, उदय सामंत यांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी पडद्यामागून कायम महत्वपूर्ण हालचाली केल्या आहेत. 


वारं कुणाच्या बाजूने फिरणार?


 कोकणातील याच मतदारसंघात काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी केलेली बंडखोरी, भाजप कार्यकर्त्यांची नाराजी आणि रिफायनरी सारख्या मोठ्या प्रकल्पावरून सुरू अललेलं राजकारण, तळागाळात ठाकरे गटाचे अससेले कार्यकर्ते यामुळे वारं नेमकं कुणाच्या बाजूनं आहे? याचा अंदाज भल्याभल्यांना बांधता येत नाहीय. त्यामुळे विजयाचा गुलाल कोण उधळणार? या नाना चर्चा या विधानसभा मतदारसंघातील पारावर सुरू आहेत.


राजन साळवींचा सलग तीन वेळा विजय


दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत याच विधानसभा मतदारसंघात महायुती जवळपास 22 हजार मतांनी पिछाडीवर राहिली. राजन साळवी यांनी 2009 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवताना 72,574 मतं घेतली. त्यांच्याविरोधातील काँग्रेसचे उमेदवार गणपत कदम यांना यावेळी 48,433 मतं मिळाली होती. 2014 मध्ये साळवींना 76, 266 मतं तर काँग्रेसचे राजेद्र देसाईंना 37,204 मतं मिळाली होती.  2019 मध्ये साळवींनी 65,443 मतं घेतली, तिथेच काँग्रेसचे अविनाश लाड यांनी 53, 557 मतं घेतली.


'या' मुद्द्यामुळे लढत चुरशीची


 सध्या राजापूर विधानसभेची लढत रंगतदार वळणार आहे. कारण दुर्गम मतदारसंघाचा रखडलेला विकास, शिक्षण आरोग्य आणि रोजगार या मुद्यांवर सध्या भर दिला जातोय. किरण सामंत याच मुद्यांवर जोर देत प्रचार करत आहेत. तर निष्ठा, गद्दारी, झालेला अन्याय, निधी वाटपात होत असलेला दुजाभाव आणि मागील 15 वर्षात केलेली विकासकामं या मुद्यांवर राजन साळवी चौथ्यांदा मैदानात आहेत.


ही बातमी वाचा : 


सुनील केदार हे मारुतीच्या बेंबीतला विंचू, भास्कर जाधवांचा हल्लाबोल