नाशिक : आदिवासीबहुल मतदारसंघ असलेल्या कळवण-सुरगाणा मतदारसंघात ( Kalwan-Surgana Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar) विद्यमान आमदार नितीन पवार हे विद्यमान आमदार आहेत. अजित पवार यांच्याकडून नितीन पवार यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर दिंडोरी लोकसभा निवडणुकीत अखेरच्या क्षणी माघार घेणाऱ्या माकपसाठी महाविकास आघाडीने कळवण विधानसभा मतदारसंघ सोडल्याची माहिती मिळत असून माकपचे माजी आमदार जीवा पांडू गावित (J P Gavit) हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघात नितीन पवार विरुद्ध जे पी गावित यांच्यात मुख्य लढत होणार असल्याचे दिसून येत आहे. 


कळवण आणि सुरगाणा मतदारसंघ 2009 साली मतदारसंघ पुनर्रचनेत अस्तित्वात आला. त्यापूर्वी कळवण मतदारसंघावर राज्याचे माजी आदिवासी विकासमंत्री स्वर्गीय ए. टी. पवार यांचे तर सुरगाणा-पेठ मतदारसंघावर माकपचे जीवा पांडू गावित यांचे निर्विवाद वर्चस्व राहिले. मात्र, कळवण-सुरगाणा मतदारसंघ एकत्र झाल्यामुळे ए. टी. पवार आणि जे. पी. गावित यांना एकमेकांविरोधात निवडणुकीला सामोरे जावे लागले होते. 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ए. टी. पवार यांनी जे. पी. गावितांचा पराभव केला तर 2014 च्या निवडणुकीत जे. पी. गावितांनी ए. टी. पवारांचा पराभव केला होता. त्यानंतर ए. टी. पवारांचे निधन झाले. त्यामुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून ए. टी. पवारांचे सुपुत्र नितीन पवार यांनी पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक (Vidhansabha Election) लढवली. 2019 च्या निवडणुकीत नितीन पवार यांनी जे. पी. गावितांचा पराभव केला होता.


नितीन पवार, जे पी गावित यांच्यात मुख्य लढत


राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर नितीन पवार हे अजित पवार गटात दाखल झाले. अजित पवार यांनी पुन्हा एकदा नितीन पवार यांना संधी दिली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी ही जागा माकपला सोडण्याच्या तयारीत आहे.  माकपचे जे.पी. गावित हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये मुख्य लढत पाहायला मिळेल. 


स्थानिक पातळीवरील राजकारणात बदल


दरम्यान, राष्ट्रवादी आणि शिवसेना दुभंगल्याने स्थानिक पातळीवरील राजकारण बदलले आहे. लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यासमोर पराभवाचा सामना करावा लागला. लोकसभा निवडणुकीत कळवण मतदारसंघात महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा दुप्पट मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे माकप-राष्ट्रवादी अजित पवार गटातील थेट लढत अत्यंत चुरशीची ठरणार आहे. या मतदारसंघात गेल्या पाच वर्षात 2200 कोटी रुपयांची विकासकामे केल्याने मतदार विकासासाठी पुन्हा आपल्याला कौल देतील, असा विश्वास विद्यमान आमदार नितीन पवार यांना आहे. तर विविध मुद्यांवर केलेल्या मोर्चे तसेच पेसा भरतीसाठी विविध आंदोलने केल्याचा फायदा जे. पी. गवितांना मिळू शकतो, असे बोलले जात आहे. आता कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघात नेमकी कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


आणखी वाचा 


Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : मालेगाव मध्य मतदारसंघातून एमआयएम की समाजवादी? कोण मारणार बाजी?