नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे बिगुल वाजल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Elections 2024) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अधिकृत उमेदवारांसह भाजपच्या बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. यामुळे भाजपचे (BJP) टेन्शन वाढल्याचे दिसून येत आहे. भाजपकडून बंडोबांना थंड करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. त्यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी बंडखोरांना थेट इशारा दिला आहे. उमेदवारी अर्ज परत न घेणारे बंडखोर सहा वर्षासाठी पक्षातून निलंबित होतील, असे त्यांनी म्हटले आहे.
बावनकुळेंचा बंडखोरांना इशारा
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, 90 टक्क्यांपेक्षा जास्त बंडखोर उमेदवार त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतील, असा आम्हाला विश्वास आहे. मात्र जे उमेदवारी अर्ज परत घेणार नाही, त्यांना सहा वर्षासाठी पक्षातून निलंबित केले जाईल. पुढील सहा वर्ष त्यांच्यासाठी पक्षाचे दारं बंद राहतील आणि कितीही प्रयत्न केले तरी निलंबन मागे होणार नाही, बंडखोरांना असा थेट इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
पक्षातील नेत्यांना भेटण्यात काहीच गैर नाही
आर्वी मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार व बंडखोरीची गर्जना करणारे दादाराव केचे यांची समजूत घालण्यासाठी भाजपने प्रथमच चार्टर्ड विमानाचा वापर केला. त्यांना थेट अहमदाबादला नेत केंद्रीयमंत्री अमित शहा यांची भेट घालवून देण्यात आली. यावरून बंडखोर शिरजोर झाले आहे का? ते पक्षश्रेष्ठींचा ऐकायला तयार नाहीत का? त्यामुळेच काहींना थेट अमित शाहांची भेट करून द्यावी लागत आहे का असा प्रश्न विचारल्यावर बावनकुळे म्हणाले की, दादाराव केचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी अमित शाह यांना भेटून आपला राजकीय प्रवास त्यांना सांगण्याची इच्छा व्यक्त केली होती. म्हणून त्यांची भेट अमित शहा यांच्यासोबत झाली. पक्षातील नेत्यांना भेटण्यात काहीच गैर नाही, असे बावनकुळे म्हटले आहे.
गोपाळ शेट्टी उमेदवारी अर्ज मागे घेतील
तर भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि बोरीवली विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करणारे उमेदवार गोपाळ शेट्टी हे अपक्ष निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसत आहे.याबाबत देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. गोपाळ शेट्टी हे सुद्धा त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतील असा विश्वास असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. आता गोपाळ शेट्टी नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा