मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीत (Mahayuti) लढत होत आहे. 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. तर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. केज विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामुळे महायुतीचे टेन्शन वाढले होते.  


केज विधानसभा मतदारसंघातून नमिता मुंदडा यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. यानंतर भाजपाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र आता संगीता ठोंबरे यांनी केज विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागे घेतली आहे. आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेत ठोंबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे संगीता ठोंबरे यांनी थेट भाजपाला आव्हान दिले आहे. 


संगीता ठोंबरे यांचा शरद पवार गटाला पाठिंबा 


केज विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना पाठिंबा दिला आहे. 2014 मध्ये संगीता ठोंबरे केज विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजयी झाल्या होत्या. परंतु 2019 मध्ये त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली आता पुन्हा या निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने संगीता ठोंबरे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर आज अखेर त्यांनी उमेदवारी मागे घेत शरद पवार गटाला पाठिंबा दिला आहे.


ज्योती मेटे यांची बीड विधानसभा निवडणुकीमध्ये बंडखोरी 


शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी काही दिवसापूर्वी शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या निवडणुकीमध्ये बीड विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी बंडखोरी करत ज्योती मेटे यांनीही आपली उमेदवारी अर्ज भरला होता. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंतही त्यांनी अर्ज मागे घेतला नाही त्यामुळे ज्योती मेटे या अपक्ष उमेदवार म्हणून बीड विधानसभा निवडणुकीमध्ये असतील. 


आणखी वाचा


Satej Patil VIDEO : दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं ना मग, मी पण दाखवली असती माझी ताकद... सतेज पाटील भडकले