मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे. निवडणुकीसाठी इच्छुक असलेले उमेदवार गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर करत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या कन्या संजना जाधव (Sanjana Jadhav) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश (Shiv Sena Shinde Group) करणार आहेत. संजना जाधव या कन्नड विधानसभेतून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असून त्यांना शिवसेना शिंदे गटातून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. 


कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत यांना पक्षाने दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. दोन वर्षापूर्वी शिवसेनेत झालेल्या बंडाच्यावेळी राजपूत यांनी पक्षावर निष्ठा दाखवत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. तर महायुतीत ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे खेचण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील होते. अखेर ही जागा शिवसेना शिंदे गटाला सुटल्याची माहिती मिळत असून रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. संजना जाधव या शिंदे गटाकडून कन्नड विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. शिंदे गटाकडून संजना जाधव यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. 


कोण आहेत संजना जाधव?


दरम्यान, संजना जाधव या भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या त्या विभक्त पत्नी असून कन्नड तालुक्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. भाजपकडून लढण्यासाठी संजना जाधव या प्रयत्न करत होत्या. मात्र महायुतीच्या जागावाटपात ही जागा शिंदे गटाच्या वाट्याला आली आहे. त्यामुळे संजना जाधव या शिंदे गटात प्रवेश करून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Vasant Deshmukh: जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुख अखेर पोलिसांच्या जाळ्यात; नगर जिल्हाबाहेरून घेतलं ताब्यात


मोठी बातमी! अजित पवार गटाच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, निलेश लंकेच्या पत्नीविरुद्ध उमेदवार ठरला