मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यभरात एकाच टप्प्यात मतदान पार पडले. राज्यात 60.46 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर एबीपी माझा सी वोटरने निवडणुकीच्या निकालाचा सर्व्हे केला. या एक्झिट पोलनुसार शिवसेना-भाजप-रिपाइं महायुती 210 (198 ते 222) जागा जिंकण्याची शक्यता आहे. महाआघाडीला 63 (49 ते 75) जागा मिळतील अशी शक्यता आहे. तर इतर पक्ष आणि अपक्षांना 15 (4 ते 21) मिळतील.


एक्झिट पोलमधील अंदाजानुसार भारतीय जनता पक्ष 140 जागा जिंकेल, तर शिवसेनेला 70 जागा मिळतील. दुसऱ्या बाजूला महाआघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 32 जागा जिंकेल, तर काँग्रेसला 31 जागा मिळतील. इतर पक्ष आणि अपक्षांना 15 जागा मिळण्याची जास्त शक्यता आहे.

महाराष्ट्रात 288 मतदारसंघ आहेत. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी 145 आमदारांचे संख्याबळ गरजेचे असते. भारतीय जनता पक्ष 140 जागा जिंकून राज्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून पुन्हा एकदा समोर येण्याची शक्यता आहे. परंतु स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला अवघ्या 5 जागांची आवश्यकता भासेल. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला इतक्या जागा मिळाल्या तर भाजप शिवसेनेला सत्तेत भागिदार करुन घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विभागनिहाय आकडेवारी
मुंबई :- महायुती - 31, महाआघाडी - 04, अन्य - 1
कोकण :- महायुती - 32, महाआघाडी - 05, अन्य - 02
मराठवाडा :- महायुती - 28, महाआघाडी - 13, अन्य - 6
पश्चिम महाराष्ट्र :- महायुती - 44, महाआघाडी - 23, अन्य - 3
उत्तर महाराष्ट्र :- महायुती - 26, महाआघाडी - 10, अन्य - 0
विदर्भ :- महायुती - 49, महाआघाडी - 08, अन्य - 03

दरम्यान, भारतीय जनता पक्षाला विदर्भात सर्वाधिक (43) जागा मिळणार आहेत. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातही भाजप चांगली मुसंडी मारण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजपला 33 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान मुंबईत महायुतीत शिवसेनेपेक्षा भाजप मोठा भाऊ ठरेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईतल्या 36 जागांपैकी 16 जागा भाजपला मिळतील, तर शिवसेनेला 15 जागा मिळतील.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा राज्यातला तिसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीला 32 जागा मिळतील असा अंदाज आहे. त्यापैकी 16 जागा पश्चिम महाराष्ट्रातल्या असतील. पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा गड मानला जातो. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीला तारणार असल्याचे चित्र आहे.

एबीपी माझा सी वोटर एक्झिट पोलमध्ये 41 हजार 146 मतदारांशी चर्चा करुन त्यांची मते जाणून घेण्यात आली. राज्यातल्या सर्व 48 लोकसभा मतदारसंघातल़्या 288 विधानसभा मतदारसंघात ही मतदानोत्तर जनमतचाचणी घेण्यात आली

एक्झिट पोल किंवा मतदानोत्तर जनमत चाचणी म्हणजे मतदान करुन मतदानकक्षाबाहेर पडलेल्या मतदारांशी पहिल्या पंधरा-वीस मिनिटांमध्ये चर्चा करुन त्याची मते जाणून घेतली जातात, त्यावरुन त्यांचा कल जाणून घेतला जातो. साधारणपणे मतदान केल्यानंतरच्या पहिल्या पंधरा-वीस मिनिटात मतदार खोटं बोलत नाही किंवा तो जो चर्चा करतो त्यावर त्याने केलेल्या मतदानाचा किंवा मतदान करताना केलेल्या विचारांचा प्रभाव कायम असतो, यामुळेच सर्वसाधारण जनमत चाचणीऐवजी मतदानोत्तर जनमतचाचण्यांची आकडेवारी निकालाच्या अधिक जवळ जाणारी मानली जाते.

एबीपी माझा सी वोटरच्या या मतदानोत्तर जनमत चाचणीत मार्जिन ऑफ एरर हा मॅक्रो लेवलवर + - 3% तर मायक्रो लेवलवर + - 5% असेल, असं गृहित धरलंय