Vadgaon Sheri Assembly Election 2024:  पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासून महायुतीत मित्रपक्ष असलेल्या आजी-माजी आमदारांमध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा लागली होती. वडगाव शेरी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या ताब्यात आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्यासह भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनीही विधानसभा लढवण्याची तयारी सुरू केली होती. वरिष्ठांनी उमेदवारीसाठी शब्द दिल्याचा दावा या दोन्ही नेत्यांकडून केला जात होता. त्यामुळे वडगाव शेरीमध्ये महायुतीची उमेदवारी नक्की कोणाच्या पदरात पडणार आणि उमेदवारी नाकारलेला नेता बंडखोरी करणार का, अशी चर्चा रंगली होती. यादरम्यान महायुतीचं जागावाटप झालं आणि ही जागा अजित पवारांच्या पक्षाला मिळाली. 


उमेदवारीमध्ये ट्विस्ट


वडगाव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना महायुतीची अधिकृत उमेदवारी मिळाली. मात्र, त्यानंतर नाराज झालेल्या भाजपचे नेते आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांना देखील पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली. त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी केली. मात्र, त्यांना पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला आणि मतदारसंघातील  बंडखोरी किंवा मैत्रीपुर्ण होणारी लढत टळली. 


2019 ला मिळालेले मताधिक्य


2019 ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) सुनील टिंगरे यांनी जिंकली. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार जगदीश मुळीक यांचा 4956 मतांच्या फरकाने पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील विजय टिंगरे हे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.


वडगाव शेरीमध्ये टिंगरे-पठारे आमने-सामने 


राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाने या मतदार संघातून आपला उमेदवार जाहीर केला आहे. त्यांनी विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना या मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला आहे, त्यांनी या मतदासंघातून बापूसाहेब पठारे यांना तिकीट दिले आहे. दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा होणार आहे.