मुंबई: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगानं 15 ऑक्टोबर रोजी केली होती. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक एका टप्प्यात पार पडत आहे. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. या 288 मतदारसंघासाठी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास 23 नोव्हेबंर ते 29 नोव्हेबंर पर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीत राज्यातील जवळपास सर्वच मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर उमदेवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उमदेवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर निवडणूक आयोगानं माहिती दिली आहे. त्यानुसार 7995 उमेदवार विधानसभेच्या रिंगणात असून त्यांनी 10905 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
29 ऑक्टोबर 2024 पर्यंत 7 हजार 995 उमेदवारांचे 10 हजार 905 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत अशी माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी देखील या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता 15 ऑक्टोबर 2024 पासून लागू झाली असून 22 ऑक्टोबर 2024 रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख होती. आजपर्यंत सादर झालेल्या अर्जांची संख्या निवडणूक आयोगानं जाहीर केलेली आहे.
उमेदवारांसाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा
निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार उमेदवारांच्या अर्जांची छाननी केली जाणार आहे. या छाननीमध्ये कोणत्या उमेदवारांचे अर्ज वैध ठरतात, कुणाचे अर्ज अवैध ठरतात याकडे देखील सर्व उमेदवारांचं लक्ष लागलेलं आहे. आजपर्यंत आलेल्या अर्जांची 30 ऑक्टोबरला म्हणजेच उद्या छाननी करण्यात येणार आहे.
4 नोव्हेंबरला चित्र स्पष्ट होणार
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं चित्र 4 नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे. कारण, उमेदवारी अर्ज मागं घेण्यासाठी 4 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळं सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची नावं स्पष्ट होतील.
प्रचाराचा जोर वाढणार
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराला जोर वाढू शकतो. सर्वच राजकीय पक्ष दिवाळीनंतर प्रचाराचा धडाका उडवू शकतात. महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, माकप, महायुतीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, युवा स्वाभिमान पार्टी,जनसुराज्य शक्ती पार्टी हे रिंगणात आहेत. या शिवाय मनसे, वंचित बहुजन आघाडी, परिवर्तन महाशक्ती यांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राज्यात विधानसभेसाठी मतदान 20 नोव्हेंबरला होत असून 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे.
इतर बातम्या :
सिंचनाच्या प्रकरणाची चौकशी मी लावली नव्हती, माझा नाहक बळी घेतला, माझं सरकार पाडलं : पृथ्वीराज चव्हाण