मुंबईशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सातारा जिल्ह्यातील दुसरा उमेदवार जाहीर केला आहे. साताऱ्यात यापूर्वी त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातून हर्षद कदम यांना उमेदवारी जाहीर केली होती. आता सातारा विधानसभा मतदारसंघातून अमित कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अमित कदम यांनी संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यानंतर त्यांना एबी फॉर्म देण्यात आला. संजय राऊत यांनी काल एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या बदल्यात सातारा आमच्याकडे घेतल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार आता सातारा विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेनं उमेदवार जाहीर केला आहे. 


अमित कदम विधानसभेच्या रिंगणात


 जावळीचे माजी आमदार जी.जी. कदम यांचे सुपुत्र अमित कदम सातारा विधानसभा मतदारसंघाच्या रिंगणात उतरले आहेत. साताऱ्याची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गेली असती तर तिथे दीपक पवार हे देखील इच्छुक होते. तर, ठाकरेंच्या शिवसेनेतून जिल्हाप्रमुख सचिन मोहिते इच्छुक होते. अखेर ठाकरेंच्या शिवसेनेकडून अमित कदम यांचा पक्ष प्रवेश झाल्यानंतर त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  अमित कदम यांच्या पक्ष प्रवेशात माजी आमदार सदाशिव सपकाळ यांची भूमिका निर्णायक ठरल्याची माहिती आहे.


अमित कदम विरुद्ध शिवेंद्रसिंहराजे भोसले लढत होणार 


महायुतीत सातारा विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आहे. भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले पुन्हा एकदा विधानसभेच्या रिंगणात आहेत. 2004, 2009 आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर राजीनामा देत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या चिन्हावर त्यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांच्यासमोर भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या दीपक पवार यांचं आव्हान होतं. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दीपक पवार यांचा पराभव करत विजय मिळवला. 


शिवेंद्रराजे भोसले पुन्हा एकदा भाजपच्या चिन्हावर सातारा विधानसभा निवडणूक लढवत आहेत. आता त्यांच्यासमोर अमित कदम यांचं आव्हान आहे. अमित कदम देखील भाजपमध्ये गेले होते. भाजपची साथ सोडून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीतील फुटीनंतर ते अजित पवारांसोबत होते. मध्यंतरी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यासाठी त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं सदस्यत्व घेतलं होतं. जागा वाटपात ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्यानं त्यांना शिवबंधन बांधाव लागलं. 


इतर बातम्या : 


आपलं तिकीटही फुकट आणि पाठिंबाही फुकट, कुणीही पैशाचा व्यवहार करू नये, जरांगे पाटलांचं आवाहन