Patan Assembly Seat Harshad Kadam Satyajeetsinh Patankar सातारा : महाविकास आघाडीकडून महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी 288 जागांपैकी 270 जागांवर सहमती झाल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यापूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहिर झाली. यात साताऱ्यातील पाटण मतादारसंघाचे उमेदवार म्हणून हर्षद कदम यांना तिकीट जाहीर करण्यात आले आहे. पाटण मतदारसंघात यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात लढत झाली होती. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला मिळेल, अशी चर्चा असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेकडून हर्षद कदम यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळं सत्यजीतसिंह पाटणकर काय भूमिका घेणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. 


पाटण विधानसभा मतदारसंघात पारंपरिकपणे देसाई आणि पाटणकर यांच्यात लढत होते. यामुळं या विधानसभा निवडणुकीत ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाईल आणि तिथे सत्यजीतसिंह पाटणकर यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून हर्षद कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेची यादी जाहीर होताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 


सत्यजीतसिंह पाटणकर कोणती भूमिका घेणार?


सातारा जिल्ह्यातील एकमेव मतदारसंघात ठाकरेंकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. या मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे. याशिवाय पाटणकरांचं देखील या मतदारसंघावर वर्चस्व आहे.  मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या मतदारसंघात उमेदवार जाहीर झाल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या ठिकाणी शंभूराज देसाई यांना शिंदे गटाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे इच्छूक उमेदवार सत्यजित पाटणकर काय भूमिका घेणार असा प्रश्न सध्या पवार गटातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याना पडला आहे.


साताऱ्यातून आतापर्यंत कुणाला उमेदवारी जाहीर?


सातारा जिल्ह्यात भाजपकडून सातारा विधानसभा मतदारसंघातून शिवेंद्रराजे भोसले, कराड दक्षिणमध्ये अतुल भोसले आणि माण विधानसभा मतदारसंघात जयकुमार गोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून वाई विधानसभा मतदारसंघातून मकरंद पाटील यांना उमेदवारी जाहीर केलीय. तर, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पाटणमधून शंभूराज देसाई आणि कोरेगावातून महेश शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. म्हणजेच महायुतीकडून सहा मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. महायुतीनं कराड उत्तर आणि फलटणचा उमेदवार जाहीर केलेला नाही. तर, महाविकास आघाडीतून हर्षद कदम यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. 


इतर बातम्या :


मोठी बातमी : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर, ठाकरेंचे 65 उमेदवार रणांगणात!