मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोमवारी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.  शिवसेनेतील खरे गद्दार उद्धव ठाकरे आहेत, असे म्हणत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंचा खास्ट सासू असा उल्लेख केला होता. आता यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरेंवर पलटवार केलाय.


संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरे हे गेली 25 वर्ष भारतीय जनता पक्षाने दिलेली स्क्रिप्ट वाचत आहेत. कधी नारायण राणेंची स्क्रिप्ट वाचतात, तर कधी एकनाथ शिंदेंना दिलेली स्क्रिप्ट वाचतात. त्यांना गांभीर्याने देण्याची गरज नाही. त्यांनी स्वतः शिवसेना पक्ष सोडलेला आहे. त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला. त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राच्या दुश्मनांना मदत होईल, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्र त्यांना फार गांभीर्याने घेत नाही, असा पलटवार त्यांनी केला आहे.  उद्धव ठाकरे यांच्यामुळे नारायण राणे, छगन भुजबळ, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडली, असेही राज ठाकरे म्हणाले. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्यामुळे नारायण राणे मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच एकनाथ शिंदे यांना पहिल्यांदा आमदारकी मिळाली आणि मंत्री पदं मिळत गेली हे राज ठाकरे यांना माहीत नसावे. 


राणेंना तुम्ही मिठ्या मारत नाही का?


उद्धव ठाकरे नारायण राणे एकनाथ शिंदे राज ठाकरे यांचा द्वेष करतात पण ज्यांनी बाळासाहेबांना सर्वाधिक त्रास दिला त्या छगन भुजबळ यांना मात्र त्यांनी घरी जेवायला बोलावले, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. यावर संजय राऊत म्हणाले की, ते छगन भुजबळ यांना बोलवत नाही का? एकनाथ शिंदे यांना तुम्ही जेवायला बोलवत नाही का? राणेंना तुम्ही मिठ्या मारत नाही का? त्यांनी पक्ष सोडला. आमच्यावर एवढा अत्याचार झाला तरी आम्ही पक्ष  सोडला का? आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत आहोत. राज ठाकरे यांचा एक चष्मा आहे, त्या चष्म्याच्या नजरेतून ते पाहतात. पंचवीस वर्षापेक्षा जास्त काळ राज ठाकरे यांना शिवसेना पक्ष सोडून झाला आहे. त्यानंतर आमचा पक्ष फार पुढे गेला. राज ठाकरे सातत्याने निवडणूक लढवत आहेत आणि हरत आहेत. 2024 च्या निवडणुकीत आमच्याकडे पक्ष नाही, आमच्याकडे चिन्ह नाही, तरीसुद्धा आम्ही लाखो मत घेऊन नऊ खासदार निवडून आणले हे राज ठाकरे विसरत असल्याचा टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला.  जनता शिवसेनेच्या पाठीशी आहे. शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले.


राज ठाकरेंनी आत्मचिंतन करावे 


महाराष्ट्राचा राजकीय चिखल झाला त्याला उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचे राज ठाकरे म्हटले. यावर संजय राऊत म्हणाले की, त्यांच्या म्हणण्याला काही किंमत आहे का? अमित शाह, मोदी, फडणवीस या महाराष्ट्राच्या दुश्मनांना जे म्हणायचं आहे ते राज ठाकरे म्हणत आहेत. तुम्हाला लोक सुपारीबाज म्हणतात. तुम्ही आत्मचिंतन करायला हवे. आमचे एकेकाळी ते मित्र होते. आम्हाला वाईट वाटत आहे. मी त्यांच्यासोबत एकेकाळी खांद्याला खांदा लावून काम केले आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.


आणखी वाचा 


Phalodi Satta Bazar Maharashtra Vidhan Sabha: राज्यात कोणाची सत्ता येणार, महायुती की मविआ? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?