रायगड :  शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस यांनी रायगडमधील अलिबागमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात विधानसभा निवडणुकीसाठी जयंत पाटील यांनी चार उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. एकीकडे महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसताना शेकापनं चार उमेदवार जाहीर केले आहेत. जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणूक इंडिया आघाडी म्हणून लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. जयंत पाटील यांनी  पेण सुधागड, उरण, पनवेल आणि अलिबाग या चार मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे.  


शेकापच्यावतीनं अलिबागमध्ये भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत अपेक्षेप्रमाणं शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील चार मतदारसंघांच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. अलिबागमधील शेतकरी भवन परिसरात शेकापचे  कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. शेकापच्या सभेत महिलांचा देखील मोठा सहभाग पाहायला मिळाला. या कार्यक्रमाला चित्रलेखा पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, अतुल म्हात्रे आणि प्रीतम म्हात्रे उपस्थित होते.  


जयंत पाटील यांच्याकडून चार उमेदवारांच्या नावांची घोषणा 


शेकापच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यापूर्वी जयंत पाटील भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.  जयंत पाटील यांनी शेकापचे अतुल म्हात्रे हे पेण सुधागड मतदार संघ मधून लढणार असल्याचं जाहीर केलं. उरणमधून शेकापचे प्रीतम म्हात्रे लढणार आहेत. 
पनवेल मधून शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर, अलिबाग मधून शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील लढणार आहेत. जयंत पाटील यांनी अलिबागमधून त्यांच्या स्नुशा चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी अपेक्षेप्रमाणं जाहीर केली आहे. उमेदवारांच्या नावांची घोषणा करताना जयंत पाटील यांनी सर्व जागा इंडिया आघाडीमधूनच लढवणार असल्याचं म्हटलं आहे.  


मविआच्या जागा वाटपात शेकापला किती जागा मिळणार?


महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातील जागावाटपाच्या चर्चांचं आणि बैठकांचं सत्र सुरु आहे. त्यामुळं मविआतील प्रमुख पक्षांमधील जागावाटप पूर्ण झालेलं नाही त्याचवेळी शेकापला किती जागा मिळणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे. मविआत शेकाप शिवाय, भाकप, माकपनं देखील मविआकडे जागांची मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीत एकही जागा न घेता मविआला साथ देणाऱ्या मित्रपक्षांच्या हात विधानसभेला काय हाती लागणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


इतर बातम्या :


Sandip Naik on Ganesh Naik : गणेश नाईकांच्या विरोधातील उमेदवाराचा प्रचार करणार का? संदीप नाईक म्हणाले...