Khadakwasla Assembly Election 2024 : खडकवासला मतदारसंघात 2009 पूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे त्यापाठोपाठ शिवसेनेची सत्ता होती. हा मतदारसंघ गेल्या तीन टर्मपासून भाजपकडे आहे. या निवडणुकीत भाजप आपला उमेदवार देणार की ही जागा महायुतीत मित्रपक्षांना म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोडणार अशा चर्चा आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार यावर देखील बाकी समीकरणे अवलंबून असणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार असलेला वडगाव शेरी मतदारसंघावर भाजपने तडजोड केली तर, ‘वडगाव शेरी’ च्या बदल्यात ‘खडकवासला’ मतदारसंघाची मागणी केली जाऊ शकते. त्यामुळे सध्या या मतदारसंघात कोणत्याही उमेदवारांचे नाव जाहीर करण्यात आलं नसल्याच्या चर्चा आहेत. या मतदारसंघात भाजपचे विद्यामान आमदार भीमराव तापकीर आहेत. गेल्या विधानसभेत त्यांनी ‘हॅटट्रिक’ साधली होती. आता चौथ्यांदा ते निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक आहेत. मात्र, बदलेल्या राजकीय समीकरणामुळे आणि एकत्रित आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमुळे तापकीर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
खडकवासला मतदारसंघात कशी आहे परिस्थिती
भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर चौथ्यांदा हॅटट्रिक मारण्याच्या तयारीत आहेत, माजी आमदार कुमार गोसावी हे देखील इच्छुक आहेत. या मतदारसंघातून भाजपमधील माजी नगरसेवक प्रसन्न जगताप, हरिदास चरवड, दीपक नागपुरे, दिलीप वेडे-पाटील इच्छुक आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी नगरसेवक सचिन दोडके यांनी उमेदवारी मागितली आहे. माजी नगरसेवक बाळा धनकवडे व काका चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे, संघटनेत कार्यरत असणारे उद्योजक राहुल घुले- पाटील यांच्या सह नऊ जणांनी उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली होती. मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने सचिन दोडके यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी अवघ्या दोन - अडीच हजार मतांनी त्यांचा केला होता.
खडकवासला मतदारसंघाची 2009 मध्ये निर्माण झाल्यानंतर दिवंगत आमदार रमेश वांजळे यांनी मनसेकडून निवडणूक लढवून विजय मिळवला. 2011मध्ये त्यांचे अकाली निधन झाले, त्यानंतर पोटनिवडणूक पार पडली. त्यावेळी भाजपने माजी नगरसेवक भीमराव तापकीर यांच्यावरती ही जबाबदारी दिली. वांजळे यांच्या पत्नी हर्षदा वांजळे यांच्याविरोधात तापकीर 3625 मतांनी जिंकले. वांजळेंच्या पराभवानंतर खडकवासला मतदारसंघ भाजपच्या हाती आला.
खडकवासला मतदारसंघात भाजप पक्षाला मानणारा मोठा मतदार आहे. गेल्या तीन निवडणुकांमध्ये सलग तापकीर वजय मिळवत आले आहेत. 2011 नंतर 2014 आणि 2019 च्या निवडणुकांमध्ये ते विजयी झाले होते. आता चौथ्यांदा हॅटट्रिक साधण्यासाठी तयारी केली असताना मित्रपक्षांच्या मागणीमुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
2019 ला मिळालेले मताधिक्य
भीमराव तापकीर - 120518
सचिन दोडके - 117923