शिर्डी : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चा (Maharashtra Assembly Election 2024) प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीच्या (Mahayuti) बड्या नेत्यांच्या प्रचार सभा होत आहे. आज काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी शिर्डी येथे अहिल्यानगर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतली. या सभेतून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) जोरदार हल्लाबोल केला. तसेच पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी कधी बाळासाहेब ठाकरे यांचं कौतुक करत नाहीत, त्यामुळे राहुल गांधींना बाळासाहेबांचं कौतुक करायला लावून दाखवावं, असं आव्हान महाविकास आघाडीतील नेत्यांना दिले होते. यावरूनही प्रियांका गांधी यांनी पीएम मोदींना प्रत्युत्तर दिले आहे.  


प्रियांका गांधी म्हणाल्या की, देशातील या भूमीने देशाला दिशा दाखवली आहे. स्वातंत्र्याची लढाई इथूनच मजबूत झाली. जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले...तोच साधू ओळखावा...देव तेथेची जाणावा, असा मराठीतून श्लोक म्हणत संत तुकारामांचा दाखला देत त्यांनी मानवतेचा संदेश दिला. साईबाबांचा समानतेचा, मानवतेचा संदेश हाच खूप महत्त्वाचा आहे, असेही त्यांनी म्हटले. 


मी राहुल गांधींची बहीण


त्या पुढे म्हणाल्या की, मोदीजींच्या राज्यात सत्याची बाजू कुठे राहिली आहे. त्यांचे मंत्री असो अथवा आमदार काहीही बोलू शकतात. याच महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा देखील अपमान होत आहे. संसदेबाहेरील शिवाजी महाराजांची प्रतिमा हटवली. सिंधुदुर्गातील पुतळा देखील पडला. मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण आहे. मी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेते. बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा वेगळी होती. मात्र, शिवाजी महाराजांचा अपमान त्यांनी सुद्धा सहन केला नसता. मोदींना मी आव्हान देते त्यांनी जातीय जनगणना करणार असल्याचं एकदा जाहीर करावे, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.


ही समानता आहे का?


राहुल गांधींना मोदी घाबरू लागले आहेत. म्हणून त्यांच्यावर टीका करण्याचं काम मोदी करतात. महाराष्ट्रातील अनेक उद्योग बाहेर घेऊन गेले. दुसऱ्या राज्यात घेऊन गेले. ही समानता आहे का? इंदिराजींनी अनेक निर्णय घेतले पण भेदभाव केला नाही. मोठे-मोठे उद्योग आज महाराष्ट्रातून काढून नेले. बेरोजगारी वाढवली आणि आज महाराष्ट्र मजबूत करण्याचं सभेतून बोलतात. तुमचं लक्ष विचलित करण्याशिवाय हे कोणतं काम करत नाही. मोदी भाषणातून आतंक नहीं है म्हणतात, एकदा महाराष्ट्रातील लोकांना भेटा त्यानंतर ते सांगतील काय आतंक आहे, असेही त्यांनी म्हटले. 



आताच लाडकी बहीण योजना का आणली?  


महागाई, बेरोजगारी अशा अनेक समस्या आज आहेत. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये आता दिले. मात्र, तुमच्याकडून किती घेतले जातात हा सुद्धा विचार केला पाहिजे. निवडणूक आली म्हणून पैसे दिले जात आहे. दहा वर्ष यांचं सरकार देशात आहे. राज्यात अडीच वर्ष सरकार आहे. मग आजच ही योजना का आणली?  नवीन रोजगार तयार करायचे नाही आणि मंचावर येऊन आज मोदी सरकार असे म्हणतात. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. शेतकरी आज संकटात आहे. कोणत्या तोंडाने तुम्ही महाराष्ट्र पुढे नेणार म्हणता, अशी टीका देखील प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली. 


आणखी वाचा 


Rahul Gandhi : महाराष्ट्रातील किती कोटींचे प्रकल्प आणि किती लाख रोजगार गुजरातला पळवले? राहुल गांधींनी कुंडलीच मांडली!