अहिल्यानगर : पारनेर विधानसभा मतदारसंघात (Parner Vidhan Sabha Constituency) महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या पत्नी राणी लंके (Rani Lanke) यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात अजित पवार गटाकडून काशिनाथ दाते (kashinath Date) निवडणुकीच्या रिंगणात आहे. या मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला आहे. काशिनाथ दाते यांना निलेश लंके यांचे कट्टर विरोधक विजय औटी यांनी पाठिंबा जाहीर केलाय. आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काशिनाथ दाते यांच्या प्रचारासाठी पारनेरमध्ये सभा घेतली. या सभेत विजय औटी यांनी हजेरी लावत काशिनाथ दाते यांना पाठिंबा जाहीर केला. यामुळे राणी लंके यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
पारनेरच्या सभेत अजित पवार म्हणाले की, अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक सभा केल्या. पारनेर तालुक्यात आल्यावर माझ्या आजोळी आल्यासारखं वाटतं. अहिल्यानगर जिल्ह्याची राजकीय पार्श्वभूमी मला माहीत आहे. पारनेरच्या जागेबाबत महायुतीतील इतरही पक्षाने मागणी केली होती. मागे एकदा बबनराव पाचपुते यांनी जसं वेगळी वाट धरली, तेव्हा पाच-सहा विरोधकांना एकत्र केलं होतं. तसंच पारनेरमधील पाच-सहा जणांना एकत्रित करून उमेदवारी देण्यात आली आहे. जे काशिनाथ दाते यांच्यासोबत आले आहेत. त्यांचा योग्य वेळी योग्य सन्मान केला जाईल, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.
मी शब्द पाळणारा व्यक्ती
आमचा प्रतिनिधी स्वच्छ आणि सर्वामध्ये जाणारा आहे. काशिनाथ दाते यांच्या विजयाबाबत माझ्या मनात अजिबात शंका नाही. आम्ही पक्षाच्या जाहीरनाम्यात पुढील पाच वर्षे काय करणार हे सांगितले आहे. माझ्या सारख्या शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या व्यक्तीला तुम्ही साथ दिली. मी देखील शब्द पाळणारा व्यक्ती आहे. कांदा निर्यातबंदीबाबत केंद्र सरकारने निर्णय केल्याने लोकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. याबाबत आम्ही केंद्र सरकारसोबत बोललो. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली. 'संविधान बदलणार' हा फेक नरेटिव्ह विरोधकांनी उपस्थित केला गेला. काँग्रेसवाल्यांनीच बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात दोनदा उमेदवार देऊन त्यांना पराभूत केलं होतं. एकीकडे त्यांच्या विरोधात उमेदवार द्यायचा दुसरीकडे संविधान बदलणार म्हणून आमच्यावर टीका करायची. जोपर्यंत चंद्र, सूर्य आहे, तोपर्यंत कुणी माय का लाल संविधान बदलू शकणार नाही.
अजित पवारांची निलेश लंकेंवर टीका
'अब की बार 400 पार' झालं की अल्पसंख्याकांना बांग्लादेशात पाठवून देणार, असा खोटा प्रचार विरोधकांकडून केला गेला. 2 कोटी 30 लाख महिलांच्या खात्यावर आम्ही पैसे पाठवले. विरोधकांनी असा प्रचार केला की राज्याला कंगाल केलं. मी 1991 पासून राजकारणात काम करतो, मला काम करण्याचा अनुभव आहे. येथे कुणाची दादागिरी आहे का? येथे कुणाची दडपशाही आहे का? याचा विचार तुम्ही करा, असे म्हणत अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे निलेश लंके यांच्यावर टीका केली. पारेनर तालुक्यात 126 कोटी रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून देण्यात आली. मुलींच्या मोफत शिक्षणासाठी 75 हजार कोटी रुपये लागणार आहेत. यावरून विरोधक टीका करतात, पण मी पगार वेळेवर केलेत, पेन्शन वेळेवर दिलेत. आम्ही लोकसभेला सुजय विखेंना उमेदवारी दिली तर तुम्ही त्यांना पाडलं. समोरच्याला (निलेश लंके) निवडून दिले, केंद्रात सरकार वेगळं आहे, तो काय काम करणार? सुजय विखे यांना निवडून दिलं असतं तर मोदी-शाह यांच्याकडून त्यांनी निधी आणला असता. पण तुम्ही समोरच्याला निवडून देऊन काय साध्य केलं? तुम्ही कधी कधी भावनिक होतात, असेही अजित पवार यांनी म्हटले.
विजय औटी यांचा काशिनाथ दातेंना पाठिंबा
दरम्यान, अजित पवार यांच्या सभेत पारनेरचे अपक्ष उमेदवार विजय औटी यांनी उपस्थिती लावली. विजय औटी यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार काशिनाथ दातेंना पाठिंबा दिला. ते निलेश लंके यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. निलेश लंके यांना विरोध करण्यासाठी त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. आता विजय औटी यांनी काशिनाथ दातेंना पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण निर्माण झाले आहे.