Deepak Kesarkar on Raj Thackeray : बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांवर चालणाऱ्या लोकांनांच त्यांची प्रॉपर्टी मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे  बाळासाहेबांच्या विचारांवर चालतात म्हणून लोक त्यांच्याबरोबर राहिले. मशालीपेक्षा त्यांना जास्त मते मिळाली असल्याचे मत मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं. बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले हे महाराष्ट्रातील जनतेला माहित असल्याचे केसरकर म्हणाले. दरम्यान, राज ठाकरे हे मोठे नेते आहेत. ते काय बोलले यावर माझ्यासारख्या छोट्या माणसाने बोलणे योग्य नाही असे केसरकर म्हणाले. 


सावरकरांचा ज्यावेळी अपमान झाला त्यावेळी बाळासाहेबांनी जोडो मारो आंदोलन सुरु केले होते. ते मंत्री मुंबईत पाऊल नाही टाकू शकले, ही बाळासाहेबांची ताकद होती. सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी काहीही बोलावे आणि आमच्या युवराजांनी त्यांना मिठी मारावी, हे चित्र सुद्धा आमच्या जनतेने पाहिले असं केसरकर म्हणाले. 


नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? 


शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण ही ना त्या एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी आहे, ना त्या उद्धव ठाकरेंची, ती बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी आहे, असे म्हणत राज ठाकरेंनी शिवसेना पक्ष आणि चिन्ह पळवण्यावरुन दोन्ही पक्षाच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. तुम्हाला आमदार फोडाफोडीचं राजकारण करायचंय करा, शरद पवारांसोबत माझे कितीही मतभेद असतील पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे शरद पवारांचं अपत्य आहे, ते अजित पवाराचं अपत्य नाही, असे म्हणत राज ठाकरेंनी पक्ष फोडाफोडीच्या आणि चिन्ह पळवापळवीच्या राजकारणावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोला लगावला. ते कल्याणमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या सभेत बोलत होते. 


बाळासाहेबांची हिंदुत्त्वाची ओळख पुसण्यात येत आहे


उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीसोबत गेल्यानंतर, काँग्रेससोबत आघाडी केल्यानंतर शिवसेनेच्या होर्डिंगवरती बाळासाहेबांचा फोटो असायचा पण हिंदूह्रदयसम्राट हे नाव नसायचं. मी काहीतरी उर्दू होर्डिंग्जही बघितले, ज्यावर उर्दू भाषेत बाळासाहेब ठाकरेंच्या नावाच्या अगोदर जनाब लिहिलेलं असायचं, असे म्हणत राज ठाकरेंनी बाळासाहेबांची हिंदुत्त्वाची ओळख पुसण्यात येत असल्याचं सूचवलं. तसेच माझ्या पक्षाचा एकच आमदार आहेत, तोही निघून गेला असता माझा पक्ष घेऊन. पण, आमच्या विचारातही तसला प्रकार येत नाही, असे राज यांनी म्हटलं. तर, शिवसेना ही बाळासाहेबांची व राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच आहे, असेही ठामपणे सांगितलं.