Congress Candidate List मुंबई : काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीसाठी 16 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसनं पहिल्या यादीत 48, दुसऱ्या यादीत 23  उमेदवार जाहीर केले होते. काँग्रेसच्या तिसऱ्या यादीत दिग्रस मतदारसंघात ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं माणिकराव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय होतील. दिग्रसच्या जागेसाठी काँग्रेसनं केलेल्या प्रयत्नांना यश आलं आहे. काँग्रेसनं दिग्रस मतदारसंघासाठी ठाकरेंना दर्यापूरची जागा दिल्याची माहिती आहे. 


माणिकराव ठाकरे विरुद्ध संजय राठोड 


यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस मतदारसंघात आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे आणि शिवसेना मंत्री संजय राठोड आमने सामने येणार आहेत. काँग्रेसनं शिवसनेच्या कोट्यातून ही जागा मिळवली. यासाठी काँग्रेसनं दर्यापूरची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला दिल्याची माहिती आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून दिग्रसमधून पवन जयस्वाल यांचं नाव निश्चित केलं जाणार होतं. मात्र, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील वाटाघाटीनंतर दिग्रसची जागा काँग्रेसला देण्यात आली आहे. इथं माणिकराव ठाकरे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.


उद्धव ठाकरे यांच्या सोबत झालेल्या चर्चेनंतर दोन्ही पक्षांनी दिग्रसच्या जागेसाठी अदलाबदल केल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीत दोन जागांवर कांग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अदलाबदल केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा म्हणजेच दिग्रस विधानसभा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कोट्यातील जागा काँग्रेससाठी  सोडण्यात आली. कांग्रेस कडून माणिकराव ठाकरे येथून मैदानात उतरवण्यात आलं आहे.  अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर ही कांग्रेसच्या कोट्यातील जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाला दिली असल्याची माहिती आहे. 


काँग्रेसकडून आतापर्यंत तीन याद्या 


काँग्रेसनं आतापर्यंत 87 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.  काँग्रेसनं आज दोन याद्या जाहीर केल्या आहेत. सकाळी 23 उमेदवारांची तर रात्री 16 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. तिसऱ्या यादीत विशेष बाब म्हणजे माणिकराव ठाकरे, मोहनराव हंबर्डे, सचिन सावंत, भिवंडीतून दयानंद चोरगे आणि सांगलीतून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 


महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेनं आतापर्यंत  86 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. तर, काँग्रेसनं 87 आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं 67 उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीचे साधारणपणे 240 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. 


इतर बातम्या : 


Congress 3rd Candidate List : काँग्रेसची 16 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर,माणिकराव ठाकरे ते सचिन सावंतांना उमेदवारी; सांगली-कोल्हापुरात कोणाला संधी?


Sada Sarvankar : महायुतीच्या नेत्यांचा अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याचा सूर, शिंदेंचे उमेदवार सदा सरवणकर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...