Tuljapur Assembly Election : तुळजापूर विधानसभा (Tuljapur Vidhansabha) मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण (Madhukar Rao Chavan) यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. पाच वेळा विधानसभेवर आमदार म्हणून गेलेले मधुकर चव्हाण यावेळी अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. 70 वर्ष मी ज्या पक्षाची सेवा केली, माझ्या घराची राखरांगोळी करु नका असं मी पक्षाला सांगितल्याचे चव्हाण म्हणाले. आता कोणत्याही परिस्थितीत मी माघार घेणार नाही. जनता माझ्या पाठीशी असल्याचे चव्हाण म्हणाले. तुळजापूरचे धोतर जनता विधानसभेवर पाठवणारच असेही चव्हाण म्हणाले. 


तुळजापूरचं धोतर विधानसभेवर जाणारच 


अनेकांच्या घरात दोन पक्ष आहेत. मात्र माझ्यावर टीका होतेय. मी लढणार आणि जिंकणार असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. मी पैलवान आहे, तुळजापूरचं हे धोतर विधानसभेवर जाणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 


तुळजापूर मतदारसंघात तिरंगी लढत होणार


भाजप नेते राणा जगजितसिंह पाटील यांना महायुतीकडून तुळजापूर विधानसभा मतदारंसघात उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेस पक्षाने धीरज पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मधुकरराव चव्हाण यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, काँग्रेसने अखेर धीरज पाटील यांना उेमदावारी दिली आहे. त्यामनुळं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांनी तुळजापूर विधानसभा मतदारसंघात बंडखोरी केली आहे. दरम्यान, राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी दिलेली असताना त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी कळंब धाराशिव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढणार आहेत.


कोण आहेत मधुकरराव चव्हाण?


मधुकरराव चव्हाण हे तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून आलवे आहेत. तसेच, ते दहा वर्ष मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष देखील होते. आघाडी सरकारमध्ये मधुकरराव चव्हाण  हे पाच वर्ष कॅबिनेट मंत्री देखील होते. त्यांनी राज्य शिखर बँकेचे अध्यक्ष देखील होते. मधुकर चव्हाण यांनी पक्षांतर्गत वेगवेगळे भूषविले आहेत. आज त्यांचे वय 90 झाल्यामुळे त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली आहे. पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे मधुकर चव्हाण यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळं तुळजापूर विधानसबा मतदारसंघात काँग्रेसची डोखेदुखी वाढली आहे. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे. पण उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत 4 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळं आता मधुकर चव्हाण हे आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवणार की पक्षश्रेष्ठी त्यांना उमेदवारी अर्ज माघारी घेण्यास सांगणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.