जालना : शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. हिकमत उढाण यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या सभेत एकनाथ शिंदेंनी माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर हल्लाबोल केला. इतक्या वेळा संधी देऊनही तुमच्या भागाचा विकास झाला नसेलतर हिकमत उढाणला संधी देणार की नाही, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला.
टोपी फिरवणाऱ्यांना घरी बसवणार की नाही?
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, एवढी वर्ष मतदारांना टोपी घालणाऱ्यांना तुम्ही घरी बसवणार की नाही, डोकं फिरवण्यापेक्षा टोपी फिरवा. विकासाला विरोध करणाऱ्यांना टोपलीत टाकून द्या. इतकी वर्ष तुम्ही पार्सल मुंबईला पाठवता, इथला विकास झाला नाही. एवढी वर्ष सत्तेत राहून आपला कारखाना, आपली सूतगिरणी, आपल्या बँका विकास कुणाचा झाला? विकास फक्त एकाच परिवाराचा झाला, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तुम्ही तीन वेळा मुंबईला पाठवलेलं पार्सल राँग एड्रेस म्हणून घेऊन आलोय. आता ते पार्सल मुंबईला पाठवायचं नाही. शिवसेनेचे उमेदवार डॉ. हिकमत उढाण यांना विजयी करुन मुंबईला पाठवा,असं एकनाथ शिंदे म्हणाले.
हिकमत उढाणचे दोन कारखाने तुम्हाला मदत केल्याशिवा राहणार नाहीत. लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये देत होतो, त्यांना 2100 रुपये करतोय. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतलाय. शेतकरी सन्मान योजनेची रक्कम 15 हजार करण्याचा निर्णय घेतलाय, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
हिकमत उढाण काही दिवसांपूर्वी म्हणाले गोळी कानावरुन गेली. पण, आता जाणार नाही ना, यंदा गोळी कानावरुन जाणार नाही तर आमदारकीच्या लक्ष्याचा अचूक वेध घेणार असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं. ठोक डालेंगे, बटण.. बटण... धनुष्य बाण का बटण... इतना ठोकेंगे... इतना ठोकेंगे की सामने वाले का डिपॉझिट जप्त हो जाएगा, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
आज हिकमत उढाण यांचा विजय 100 टक्के विजय होईल हा विश्वास व्यक्त करतो, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं. तुम्ही एवढे लोक एकत्र आले आहात, हिकमत उढाण जात पात धर्म न पाहता मदत करतात. त्यामुळं सर्वांनी एकत्र येऊन हिकमत उढाण यांना विधानसभेत पाठवायचं आहे, असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं. हिकमत उढाण यांना विजयी करु, असं वचन द्या, असं मुख्यमंत्री म्हणाले.
इतर बातम्या :
Kannad Election : कन्नडच्या भरसभेत घड्याळ दाखवले, मुख्यमंत्री आपल्याच खासदारावर का चिडले?