Congress Candidate list 2024 : राज्यात सध्या विधानसभेचा (Maharashtra Assembly Election 2024 ) रणसंग्राम सुरु असून प्रत्येक पक्षाकडून त्यांचे उमेदवार रिंगणात उतरवले जात आहेत. नुकतीच काँग्रेसने (Congress) त्यांची पहिली यादी जाहीर केली असून एकूण 48 उमेदवारांना पक्षाकडून संधी देण्यात आली आहे. यामध्ये अनेक दिग्गजांचा समावेश असून बरेच विद्यमान आमदार पु्न्हा एकदा मैदानात उतरले आहेत. तसेच धारावी विधानसभा मतदारसंघातून खासदार वर्षा गायकवाड यांची बहिण ज्योती गायकवाड यांना पक्षाकडून संधी देण्यात आली आहे. 


दरम्यान काँग्रेसच्या पहिल्या यादीमध्ये केवळ तीनच महिलांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये यशोमती ठाकूर, मीनल निरंजन पाटील (खतगांवकर) आणि ज्योती गायकवाड यांचा समावेश आहे. यशोमती ठाकूर या तेओसा मतदारसंघात, मीनल निरंजन पाटील नायगांव आणि डॉ.ज्योती गायकवाड या धारावीतून विधानसभेच्या रिंगणात आहेत. 


खासदारकीनंतर आमदारकीही घरात? 


अवघ्या चार महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मुंबईतील उत्तर मध्य जागेसाठी भाजपकडून उज्ज्वल निकम यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून वर्षा गायकवाड या मैदानात होत्या. मुंबईतील सहा जागांपैकी अत्यंत चुरशीची लढत ही या जागेवर झाली. वर्षा गायकवाड या खासदार होऊन दिल्लीत गेल्यानंतर आता त्यांची बहिण महाराष्ट्राच्या विधानसभेवर जाणार का? याची उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान धारावी मतदारसंघ हा मुंबईतील दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात मोडतो. या मतदारसंघात ठाकरे गटाचे अनिल देसाई हे खासदार आहेत. त्यामुळे ज्योती गायकवाडांसाठी ही लढत चुरशीची होणार की महाविकास आघाडीचाच गुलाल उधाळला जाणार याची उत्सुकता आहे. 


नागपूरच्या 6 पैकी 4 उमेदवारांची घोषणा


नागपूर शहरातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येण्याची शक्यता होती. पूर्व नागपूर आधीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे गेला आहे. काँग्रेसच्या वाट्यातील पाच मतदारसंघांपैकी काँग्रेसने आज चार मतदारसंघांचे उमेदवार जाहीर केले आहे. मात्र, ज्या दक्षिण नागपूर मतदार संघासाठी काँग्रेस आणि ठाकरे गटांमध्ये जोरदार वाद पेटले होते. ती जागा अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे, काँग्रेस आणि ठाकरे गटाचा विदर्भातील जागांबद्दलचा वाद अजूनही पूर्णपणे संपुष्टात आलेला नाही, हेच या यादीवरून दिसून येत आहे.


ही बातमी वाचा : 


Congress Candidate List : काँग्रेसची पहिली 48 उमेदवारांची पहिली यादी, 5 एसटी, 2एससी अन् दिग्गजांना संधी; पुन्हा दिसली घराणेशाही