बारामती: विधानसभा निवडणुकीमध्ये देखील बारामती मतदारसंघामध्ये पवार विरूध्द पवार अशी लढत झाली. या बारामती मतदारसंघारडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष्य लागलं होतं. या निवडणुकीमध्ये अजित पवारांनी पुन्हा एकदा मोठा विजय मिळवला आहे. अजित पवारांना 196640 तर युगेंद्र पवारांना 80458 इतकी मते मिळाली आहेत. अजित पवार 1,16,182 मतांनी विजयी झाले आहेत. अजित पवारांना गेल्या विधानसभा निवडणुकीत पडलेली तशीच रेकॉर्डब्रेक मते मिळाली आहेत.
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही आपल्या पुतण्याला पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले होते. शरद पवार यांच्या सुप्रिया सुळे यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली होती, त्यानंतर आता शरद पवारांनी बारामतीत अजित पवार यांच्याविरोधात त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं.
अजित पवारांचा गेल्या निवडणुकीप्रमाणे यावेळी विक्रमी विजय
अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत बारामती विधानसभा मतदारसंघातून सलग सात वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी या जागेवर भाजपचे गोपीचंद पडळकर यांचा विक्रमी 1,65,265 मतांनी पराभव केला होता.आता अजित पवार स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आहेत. अशा स्थितीत किमान आपला आधीचा विक्रम कायम राखण्याचा दबाव त्यांच्यावर होता, मात्र त्यांनी 2019 प्रमाणेच रेकॉर्डब्रेक मते मिळवली आहेत.
अजित पवारांनी रणनीती बदलली
लोकसभेत झालेल्या चुकातून धडा घेत अजित पवार शरद पवारांवर फारसे बोलताना दिसले नाहीत. बारामतीचा शहरी मतदार अजित पवार यांच्यासोबत दिसत होता. शरद पवारांचे आजही ग्रामीण भागात चाहते आहेत. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने लोकांमध्ये नाराजी होती आणि त्यांनी ती मतदानातून व्यक्त केली असंही अनेकदा म्हटलं जातं. पण, विधानसभा निवडणुका वेगळ्या आहेत, त्यामुळे आता पुन्हा एकदा या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. बारामतीकरांनी पुन्हा एकदा अजित पवारांना आमदार होण्याची संधी दिली आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे युवा नेते, अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बारामतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांची सांगता सभा पार पडली होती. त्यावेळी बारामतीतील मतदारांना थोरल्या आणि धाकल्या पवारांनी भावनिक साद घालून निवडून देण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, लोकसभेप्रमाणेच ही निवडणूकही भावनिक मुद्द्यावरच फिरणार असल्याच्या चर्चा होत्या.