अहमदनगर : साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी अर्थातच शिर्डी. जगभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेला शिर्डी विधानसभा मतदारसंघ पूर्वीचे काँग्रेसचे व आता भाजपवासी झालेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला. 1995 पासून ते आजपर्यंत राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघात विजय मिळविला असून पाच निवडणुकांपैकी एकदाच 2009 साली विखेंच्या मताधिक्य घटले होते. राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस, शिवसेना परत काँग्रेस आणि आता भाजप असा राजकीय प्रवास केला आहे. मात्र पक्ष कोणातही असो राधाकृष्ण विखे यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघावर आपलं वर्चस्व टिकवून ठेवलं.


गणेश, प्रवरा व आश्वी या तीन परिसरांचा बनलेल्या या मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशाने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यापुढे आव्हान निर्माण झालं आहे. यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात तगडा उमेदवार कोण हाच प्रश्न विखे विरोधकांना सध्या सतावत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेते पद असताना युतीचा उघडपणे प्रचार केला आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघात युतीला 60 हजारांचं मताधिक्य मिळवून दिलं आणि भाजप प्रवेशापूर्वीच आपली आगामी राजकीय भूमिका स्पष्ट केली.


शिर्डी विधानसभा मतदारसंघात गणेश सहकारी साखर कारख़ाना, प्रवरा सहकारी साखर कारख़ाना, शिर्डी नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, मार्केट कमिटी यांवर विखे यांचाच वरचष्मा असून तालुक्यातील अपवाद वगळता 99 टक्के ग्रामपंचायती, विविध विकास सेवा सहकारी संस्था विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांच्या ताब्यात आहेत.


मतदार संघातील बहुतांश गावात विखे विरोधक नसल्याने विखे समर्थक दोन गटातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या काही वर्षापासून लढवण्यास गेल्या आहे. मागील 2014 च्या निवडणुकीत देशात व राज्यात मोदी लाट असतानाही राधाकृष्ण विखे पाटील कॉंग्रेसच्या तिकीटावर 75 हजार मतांनी विजयी झाले होते.


2014 विधानसभा निवडणुकीतील प्रमुख उमेदवारांची स्थिती




  • राधाकृष्ण विखे पाटील (कॉंग्रेस) - 1 लाख 21 हज़ार 459 मते

  • अभय दत्तात्रय शेळके पाटील ( शिवसेना ) - 46 हजार 797 मते

  • राजेंद्र गोदकर पाटील ( भाजप) - 17 हजार 283 मते


कशी राहील यावेळची निवडणूक


राधाकृष्ण विखे पाटलांनी भाजप प्रवेश केल्यानंतर शिर्डी मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी फक्त नावाला शिल्लक राहिली आहे. मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटलांविरोधात काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नसल्याने बाळासाहेब थोरात यांचे भाचे आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांचं नाव सध्या चर्चेत आहे. सत्यजित तांबेंनी शिर्डी विधानसभेच्या उमेदवारीसाठी मुलाखत दिली आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिर्डी मतदारसंघात पूर्णत: खिळखिळी झाली असून विखेंचं पारड जड असल्याने सत्यजित तांबेचा मार्ग सध्या तरी खडतर आहे.


याशिवाय यापूर्वी अनेकदा राधाकृष्ण विखेंविरोधात आवाज उठवणारे प्रतिस्पर्धी राजेंद्र पिपाडा भाजपात आहे. विखेंनी भाजप प्रवेश केल्यानं आता पिपाडा काय करणार याकडे अनेकांचे लक्ष लागलं आहे. मागील विधानसभा निवडणुकीत सर्व पक्ष स्वबळावर लढले. यावेळी भाजप शिवसेना युती झाली तर ही जागा शिवसेनेकडे असल्याने विखे पाटील तिकीट मिळवण्यासाठी यातून कसा मार्ग घाडतात ते पाहणंही महत्वाच ठरणार आहे. युती झाली नाही तर मात्र विखेंसमोर शिवसेनेचंही मोठ आव्हान असणार आहे हे मात्र नक्की.


प्रचारातील मुद्दे


गोदावरी कालवे नुतनीकरण, प्रलंबित निळवंडे कालवे, साईसंस्थानकडून शिर्डीच्या विकासासाठीचे प्रलंबित प्रस्ताव