अहमदनगर : पारनेर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवसेनेचे विद्यमान आमदार विजय औटी हे गेले तीन टर्म या मतदारसंघाचे आमदार आहेत. 1999 साली पारनेर मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार वसंत झावरे यांची सत्ता होती. मात्र 2004 साली शिवसेनेकडून विजय औटी यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आणि शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले. त्यांनतर देखील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी 2009 आणि 2014 साली राष्ट्रवाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. मात्र शिवसेनेचे विद्यमान आमदार विजय औटी यांनी दोन्ही निवडणुकीत सुजित झावरे यांचा पराभव केला आणि पारनेर मतदार संघात शिवसेनेची सत्ता कायम ठेवली.


पारनेर मतदार संघात गेल्या 15 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. मात्र आगामी निवडणुकांमध्ये पारनेर मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या निलेश लंके यांनी मोठे शक्तीप्रदर्शन दाखवत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. निलेश लंके यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारी गेल्या वर्षभरापासून सुरु केली आहे. सुरुवातीला निलेश लंके प्रतिष्ठान स्थापन करून निवडणुकीची तयारी केली. मात्र आता राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे निलेश लंके यांना राष्ट्रवादीकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे.


निलेश लंके यांच्या राष्ट्रवादी प्रवेशमुळे राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार सुजित झावरे हे मात्र नाराज झाले आहे. सलग दोन वेळेस पराभव होऊन देखील सुजित झावरे यांनी पारनेरमधून उमेदवारी मागितली आहे. मात्र दुसरीकडे निलेश लंके यांनी देखील राष्ट्रवादीकडून आपण इच्छुक असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नाराज झालेल्या सुजित झावरे यांनी उमेदवारी न मिळाल्यास वेगळा विचार करण्याचा इशारा दिलाय. तर दुसरीकडे बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी देखील उमेदवारीची मागणी केलीये. त्यामुळे आता पक्षाकडून कोणाला तिकीट मिळतंय, हे पहावं लागणार आहे.


भाजपमध्ये मात्र उमेदवारीसाठी रस्सीखेच होणार पाहायला मिळत नाहीये. राज्य पातळीवर भाजप-शिवसेना युती झाल्यास हा मतदारसंघ शिवसेनेकडेइ जाणार असल्याने भाजपमध्ये शांतता आहे. युती न झाल्यास ऐनवेळी भाजपमध्ये दाखल होण्याच्या मार्गावर असलेले राष्ट्रवादीतील नाराज सुजित झावरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. विखे हे भाजपमध्ये गेल्यानंतर विखेची ताकद वाढली आहे. त्यातच विखेंना मानणारा मोठा गट पारनेर तालुक्यात आहे. त्यामुळे युती न झाल्यास विखे म्हणतील तोच उमेदवार पारनेरमध्ये उभा राहू शकतो.


शिवसेनेत मात्र राजकीय घडामोडींना वेग आलाय. शिवसेनेचे विद्यमान आमदार विजय औटी यांना पक्षातूनच आव्हान उभे राहिले आहे. विजय औटी यांना विधानसभेचे उपाध्यक्ष पद मिळाल्यानंतर त्यांनी पारनेर तालुक्यात विकासकामांचा तडाखा लावलाय. मात्र नगर जिल्हा परिषेदेचे सदस्य संदेश कार्ले हे पारनेर मतदारसंघातून शिवसेनेकडून इच्छुक आहे. पारनेर मतदारसंघातील अहमदनगर गटात संदेश कार्ले यांना मानणार वर्ग मोठा आहे. कार्ले यांनी अहमदनगर गट पिंजून काढला असून आता पारनेर शहरात देखील संपर्क वाढवण्यास सुरुवात केलीये. त्यामुळे पारनेरमध्ये विद्यमान आमदार विजय औटी यांना संदेश कार्ले यांचे आव्हान उभे राहिले असून पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळते हे पहावं लागणार आहे.

पारनेर मतदारसंघात शिवसेनेचे आमदार विजय औटी यांनी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला असला तरी पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. ग्रामीण भागात शेतीसाठी तर शहरी भट पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा गंभीर विषय आहे. पारनेर तालुक्यातील सुपा येथे MIDC आहे. मात्र या MIDC मध्ये पारनेरमधील बेरोजगारांना रोजगार मिळावा अशी देखील तरुणांची मागणी आहे.


विधानसभा निवडणूक 2014 मतदानाची आकडेवारी




  • विजय औटी (शिवसेना) - 73,263

  • सुजित झावरे (राष्ट्रवादी) - 45,841

  • बाबासाहेब तांबे (भाजप) - 24,050

  • माधवराव लांखेडे (अपक्ष) - 45,822


विशेष म्हणजे पारनेर तालुक्यात राधाकृष्ण विखे यांचा मोठा गट कार्यरत आहे. त्यातच राधाकृष्ण विखे भाजपमध्ये प्रवेश केल्याने पारनेर तालुक्यातील काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. तर दुसरीकडे विजय औटी यांना विधानसभेचे उपसभापती पद मिळाल्याने विजय औटी यांचे पारडे जड असले तरी त्यांना पक्षातूनच आव्हान उभा राहील आहे. त्यामुळे पारनेर मतदार संघात चुरशीची लढत होणार हे नक्की.