हिंगोली : काँग्रेसचे माजी खासदार तथा गुजरातचे राज्य प्रभारी राजीव सातव यांचा हा बालेकिल्ला. कळमनुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये सुरुवातीपासूनच काँग्रेसने अधिराज्य गाजवले आहे. या मतदारसंघांमध्ये मुस्लीम, आदिवासी, बंजारा, हटकर या समाजावरच येथील राजकारण अवलंबून आहे.


मुस्लिमांच्या मतावर काँग्रेसने चार वेळा सत्ता गाजवली. तर हटकर आणि आदिवासी समाजाच्या मतांवर माकपचे विठ्ठल नाईक यांनी हे देखील चार वेळा सत्तेत आले. 2014 च्या निवडणुकीमध्ये राजीव सातव यांनी खासदारकीसाठी उडी घेतल्याने त्यांच्या ठिकाणी काँग्रेसकडून संतोष टारफे हे आमदार झाले.


संतोष टारफे यांनी शिवसेनेचे गजानन घुगे यांचा अवघ्या 300 मतांनी घासून पराभव करुन विजय मिळवला.


2014 विधानसभा निवडणूक निकाल


संतोष टारफे (काँग्रेस) 56,568 मते
गजानन घुगे (शिवसेना) 56,268 मते
शिवाजी माने (भाजप) 38,085 मते


विद्यमान आमदारावर मतदाराची नाराजी


काँग्रेस पक्षाकडून कळमनुरी विधानसभा मतदारसंघासाठी सध्याचे विद्यमान आमदार संतोष टारफे हे आदिवासी समाजाचे आहेत. याच मतदारसंघांमध्ये आदिवासी समाजाची संख्या जास्त आहे. परंतु आदिवासी समाज बांधवांना व इतर देखील समाजांना मिळत नसलेल्या पुरेशा सोयीसुविधा, त्यामुळे हा समाज संपूर्ण शिवसेना, भाजप, वंचितच्या वाटेवर दिसून येतो. त्यामुळे याचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे.


2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी चर्चेत असलेले नेते


शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर या मतदारसंघांमधून इच्छुक आहेत. संतोष बांगर यांनी या मतदारसंघांमध्ये मागील काही दिवसापासून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. संतोष बांगर यांना शिवसेनेकडून या मतदारसंघासाठी उमेदवारी मिळण्याची चिन्हे आहेत. सध्या त्यांची नावे चांगलीच चर्चेत आहे.


यापूर्वी मराठा शिवसैनिक सेनेमध्ये संस्थापक अध्यक्ष असलेले विनायक भिसे आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर रासपमध्ये गेले आहे. कारण या मतदारसंघांमध्ये पिवळ्या झेंड्याखाली येणारा आदिवासी समाज व हटकर समाज यांची संख्या जास्त आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठीच्या हालचाली विनायक भिसे यांच्याकडून सुरु आहेत.


काँग्रेसकडून विद्यमान आमदार संतोष टारफे हेच पुन्हा एकदा रिंगणात उतरतील असच चित्र आहे. राष्ट्रवादीकडून मात्र अद्याप देखील एकही चेहरा या मतदारसंघातून समोर आलेल्या दिसत नाही. तर वंचित बहुजन आघाडीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या असून यामध्ये 10 ते 15 उमेदवारांनी अर्जाद्वारे इच्छा व्यक्त केली आहे. परंतु अद्याप कुणाचेही नाव स्पष्ट करण्यात आले नाही.


2019 लोकसभा निवडणूक निकाल


हेमंत पाटील (शिवसेना) - 5,86,312 मते
सुभाष वानखेडे (काँग्रेस) - 3,08,456 मते
मोनहन राठोड (वंचित) 1,74,051 मते


कळमनुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीला सरस उमेदवार मिळाला तर याचा फटका काँग्रेसला बसू शकतो. तर याचा फायदा शिवसेना किंवा भाजपा होऊ शकतो.