Maha Vikas Aaghadi : कधी जुळतंय, तर कधी तुटतंय... अशी काहीशी अवस्था महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aaghadi) जागावाटपाची झाली आहे. कधी जागावाटप फायनल झाल्याचं सांगितलं जातं, तर कधी काही जागांवरून रुसवे फुगवे असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच आता ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि काँग्रेसमध्ये (Congress) काही जागांवर वाद असल्याचं समजतंय. तर पुण्यात मात्र ठाकरे गटात शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीवर नाराजी पुढे आली आहे.
आधी भांडणं, मग गळ्यात गळे आणि पुन्हा भांड्याला भांडी... असं काहीसं चित्र निवडणुका जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडीच्या बाबतीत पाहायला मिळतंय. त्यात आता जागावाटप अंतिम टप्प्यात आलेलं असतानाही रुसवे-फुगवे संपायचं नाव घेत नाहीत. काही जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेनं एबी फॉर्म दिल्यानं काँग्रेसचे दिल्लीतले नेते नाराज झाल्याची माहिती मिळत आहे.
महाविकास आघाडीत कोणत्या जागांवरुन तिढा?
- वर्सोवा : ठाकरेंकडून हरुन खान यांना उमेदवारी, काँग्रेसकडून संजय पांडे इच्छुक
- वांद्रे पूर्व : काँग्रेसचे सचिन सावंत इच्छुक, ठाकरेंकडून वरूण सरदेसाईंना उमेदवारी
- वडाळा : पूर्वापार काँग्रेसची जागा, ठाकरेंच्या शिवसेनेकडून श्रद्धा जाधव यांना एबी फॉर्म
- भायखळा : ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनोज जामसुतकर यांना एबी फॉर्म, काँग्रेस अजुनही इच्छुक
- रामटेक : ठाकरेंच्या शिवसेनेकडून विशाल बरबटे यांना उमेदवारी, काँग्रेसकडून राजेंद्र मुळक इच्छुक
- वणी : ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय देरकरांना उमेदवारी, काँग्रेसचे संजय खाडे इच्छुक
- यवतमाळ : काँग्रेसकडून बाळासाहेब मांगुळकर यांना उमेदवारी, ठाकरेंची शिवसेनाही इच्छुक
- मिरज : काँग्रेसचे मोहन वानखेडे इच्छुक, ठाकरेंच्या शिवसेनेचाही दावा
वांद्रे पूर्वच्या जागेवरुन नवा वाद?
वांद्रे पूर्वच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाकडून वरुण सरदेसाईंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अशातच आता या जागेवरुनही महाविकास आघाडीत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण, ठाकरेंनी वरुण सरदेसाई यांना जाहीर केलेल्या वांद्रे पूर्वच्या जागेसाठी काँग्रेस नेते सचिन सावंत इच्छुक आहेत. तर, त्यांना अंधेरीतून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, ते वांद्रे पूर्वमधून लढण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र तिथं उद्धव ठाकरेंनी वरूण सरदेसाईंना उमेदवारी दिलीय. त्यामुळे आता महाविकास आघाडीत नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
एकीकडे काँग्रेस आणि ठाकरे गटात वादाची चर्चा रंगली आहे. तर, दुसरीकडे पुणे जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ठाकरे गटाला संपवण्याचा कट रचल्याचा आरोप केला जात आहे.
पुणे जिल्ह्यात ठाकरे गटाला अजून जागाच देण्यात आलेल्या नाहीत. संपूर्ण पुणे जिल्हात महाविकास आघाडीच्या वतीनं आतापर्यंत 21 पैकी 12 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. तर, शरद पवार गटाकडून 10 उमेदवारांच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. जुन्नर, आंबेगाव, शिरूर, इंदापूर, बारामतीत पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यासोबतच, पिंपरी, वडगाव शेरी, खडकवासला,पर्वती,हडपसरमध्येही शरद पवार गटाचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, काँग्रेसकडून पुरंदर, भोर, कसबा पेठ या तीन जागी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे आता उरलेल्या 8 जागा तरी ठाकरे गटाला मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अर्ज भरण्याच्या मुदतीसाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. तरीसुद्धा महाविकास आघाडीचं अजून बिनसलेलंच आहे. निवडणुका तोंडावर असूनही महाविकास आघाडीत अजून काही जागांवरून घोळ सुरू आहे. त्यामुळे, प्रचार कधी सुरू करायचा आणि नेमका कुणाचा करायचा? असा प्रश्न महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांपुढे उभा ठाकल्याचं दिसतंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :