भोपाळ : मध्य प्रदेशात काँग्रेसचा सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण "आम्हाला बहुमत नसल्याने सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही," असं शिवराज सिंह चौहान यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. तसंच शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपदाचाही राजीनामा दिला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात काँग्रेसच सत्ता स्थापन करणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 24 तासांनी पूर्ण झाली. अंतिम निकालात काँग्रेसला सर्वाधिक 114 जागा मिळाल्या. तर भाजप 109, बसपा 2, सपा 1 आणि अपक्षांना 4 जागा मिळाल्या. त्यामुळे काँग्रेसने काल (11 डिसेंबर) रात्रीच राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना पत्र लिहून सत्ता स्थापनेचा दावा केला होता. तर मध्य प्रदेशात कोणालाही बहुमत नसल्याने भाजपही सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह यांनी ट्विटरवरुन दिली होती.

शिवराज सिंह चौहान यांच्या निवासस्थानी आज निवडणूक निकालाबाबत चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप सत्ता स्थापन करणार नसल्याचं सांगितलं. शिवाय त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही दिला. "आता मी मुक्त झालो आहे. माझा राजीनामा राज्यपालांना सोपवला आहे. मध्य प्रदेशातील पराभवाची संपूर्ण जबाबदारी माझ्या एकट्याची आहे. मी कमलनाथ यांचं अभिनंदन केलं आहे," असं शिवराज सिंह चौहान म्हणाले.


दुसरीकडे बसपाही काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याची मायावती यांनी जाहीर केलं. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही मध्य प्रदेशात काँग्रेसला पाठिंबा देत आहे. काँग्रेसची अनेक धोरणं आम्हाला पटत नसली तरी गरज पडल्यास राजस्थानमध्येही पाठिंबा, असं मायावती सांगितलं.
तर समाजवादी पक्षाचाही काँग्रेसला पाठिंबा आहे, अशी घोषणा अखिलेश यादव यांनी केली.


'मामा' नावाने ओळखले जाणारे शिवराज सिंह चौहान मागील 13 वर्षांपासून मध्‍य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेस अध्‍यक्ष राहुल गांधी, कमलनाथ, ज्‍योतिरादित्‍य सिंधिया आणि दिग्विजय सिंह यांनी यंदा मध्य प्रदेशात जोरदार प्रचार केला होता. सत्ताविरोधी लाटेतही शिवराज सिंह चौहान यांनी राजस्‍थान आणि छत्तीसगडच्या तुलनेत चांगली कामगिरी केली.

संबंधित बातम्या

मध्य प्रदेशात ट्विस्ट, सत्तेसाठी भाजप-काँग्रेसचा दावा

मध्य प्रदेशातील मजमोजणी पूर्ण, काँग्रेस सर्वात मोठा पक्ष

मध्य प्रदेशात काँग्रेसचे सत्ता स्थापनेचे प्रयत्न सुरु, राज्यपालांकडे मागितली वेळ