Madha Lok Sabha Constituency Dispute : मागील दोन-तीन दिवसांपासून सुरु असलेला माढा लोकसभा मतदारसंघाचा (Madha Lok Sabha Constituency) तिढा अखेर सुटला असल्याची माहिती मिळत आहे. आज झालेल्या बैठकीत रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासमोर महायुतीचे काम करण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे त्यांनी रणजीत नाईक निंबाळकर (Ranjit Naik Nimbalkar) यांच्या उमेदवारीला पाठींबा दिल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे, उत्तराव जानकर यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर महायुतीच्या उमेदवारास सहकार्य करण्याची भूमिका घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे भाजपसह महायुतीला मोठा दिलासा मिळाला आहे.
माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये पुन्हा एकदा रणजीत नाईक निंबाळकर यांना भाजपच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले रामराजे नाईक निंबाळकर यांनी नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे त्यांना विजयसिंह मोहिते पाटील यांची साथ मिळाली. त्यामुळे मागील दोन दिवसांत माढा लोकसभा मतदारसंघात सुरु असलेल्या नाराजीनाट्यानंतर मुंबईतील घडामोडींना आज वेग आल्याचे पाहायला मिळाले. शेवटी रामराजे नाईक निंबाळकर आणि फडणवीसांसह अजित पवारांची बैठक झाली. या बैठकीत रामराजे यांची नाराजी दूर करण्यात आल्याची माहिती मिळत असून, मराजे नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासमोर महायुतीचे काम करण्याचा शब्द दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आज दिवसभरात नेमकं काय घडलं?
दोन दिवसात वाढत्या घडामोडी पाहता रामराजे नाईक निंबाळकर आपली नाराजी दूर करण्यासाठी मुंबईला अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते. सोमवारी दिवसभर चर्चा न झाल्यामुळे मंगळवारी सकाळी रामराजे नाईक निंबाळकर थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू संजीव राजे नाईक निंबाळकर देखील उपस्थित होते. माढा लोकसभा मतदारसंघासाठी संजीव राजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादीचे उमेदवार असावेत अशा पद्धतीची मागणी होती. त्यांनाही उमेदवारी न मिळाल्यामुळे ते देखील नाराज असल्याच्या बातम्या सुरू होत्या. त्यामुळे आज सकाळी रामराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, रणजीत निंबाळकर आणि श्रीकांत भारतीय यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची यांची एकत्रित बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये अर्धा तास चर्चा केल्यानंतर अजित पवार देवगिरी निवासस्थानी निघून गेले. तत्पूर्वी रामराजे नाईक निंबाळकर देखील बाहेर पडले. यावेळी रामराजे नाईक निंबाळकर यांना सोडण्यासाठी भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर देखील बाहेर आले होते. ही घडामोडी पाहता रामराजे नाईक निंबाळकर यांची नाराजी दूर झाली का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. यानंतर माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व असणारे उत्तमराव जानकर हे देखील सागर निवासस्थानी पोहोचले. सागर निवासस्थानी उत्तमराव जानकर, रणजितसिंह निंबाळकर, श्रीकांत भारतीय, जयकुमार गोरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडली. जवळपास पाऊण तास चाललेले या बैठकीनंतर बाहेर येऊन श्रीकांत भारतीय यांनी सगळं काही ठीक आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया देत माढा लोकसभा मतदारसंघातील जिल्हा सुटला अशा पद्धतीची भावना व्यक्त केली आहे. याबाबत अद्याप रामराजे नाईक निंबाळकर यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
इतर महत्वाच्या बातम्या :