कल्याण : चौथ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या 17 मतदारसंघांपैकी कल्याण लोकसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान झालं आहे. मात्र मतदानाला उन्हामुळे फटका बसल्याचा दावा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

कल्याण मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत अवघं 33.77 टक्के मतदान झालं आहे. त्यामुळे मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्यास सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते धावपळ करत आहेत. एकनाथ शिंदे हे सुद्धा सकाळपासून ठाणे जिल्ह्यातल्या तिन्ही मतदारसंघात फिरत असून उन्हामुळे मतदार बाहेर पडत नसल्याचा दावा त्यांनी एबीपी माझाशी बोलताना केला.

तसेच संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अंदाजे 50 ते 55 टक्के मतदान होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. काही ठिकाणी ईव्हीएम मशिन्समध्ये बिघाड झाल्यानेही मतदानावर परिणाम झाल्याचा दावा त्यांनी केला.