औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण आज शिवसेना नेते अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादमध्ये भेट घेत गुप्त चर्चा केली.

या भेटीनंतर दोन दिवसात अर्जुन खोतकर यांच्याबद्दल गूडन्यूज मिळेल, असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी गौप्यस्फोट केला आहे. आज अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार या दोघांमध्ये औरंगाबादच्या सातारा परिसरात तासभर चर्चा झाली.
VIDEO | राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याशी बातचीत | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा


या भेटीनंतर अब्दुल सत्तार  म्हणाले की, आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. दोघेही राजकीय क्षेत्रात एक आहोत, सुखदुःखात एकमेकांना मदत करतो. आज चर्चा काहीही असू द्या. मात्र लोकसभेच्या निकालानंतर नक्की आनंद होईल. आनंदाची बातमी नसती तर आम्ही भेटलोच नसतो, असा गौप्यस्फोट सत्तार यांनी केला.

अजूनही मी लोकसभेच्या रिंगणात आहे असं म्हणणाऱ्या अर्जुन खोतकर यांनी आज काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार  यांच्यासोबत गुप्त बैठक केली.  तासाभरापेक्षा अधिक काळ दोघांची गुप्त बैठक झाली. गेल्या काही दिवसांपासून अर्जुन खोतकर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणारअसल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

मी अद्यापही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात, उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास निवडणूक लढणार : अर्जुन खोतकर
जालना लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजुनही सुटलेला नसल्याचं चित्र आहे. आजपर्यंतचे सर्व सर्व्हे हे माझ्या बाजुनं आहेत. मी लढण्यास इच्छूक असून उद्धव ठाकरे माझ्या बाबतीत योग्य निर्णय घेतील, अशी आशा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी एबीपी माझाच्या ब्रेकफास्ट न्यूजमध्ये बोलताना व्यक्त केली.

अर्जुन खोतकर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. दोघांमधील राजकीय वैर भाजप-शिवसेना युतीसाठी डोकेदुखी ठरत आहे. भाजपच्या संभाव्य लोकसभा उमेदवारांच्या यादीत रावसाहेब दानवेंचं नाव आहे. मात्र मी अद्यापही निवडणुकीच्या रिंगणात असल्याचं खोतकरांनी म्हटलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास आपण निवडणूक लढण्यास तयार असल्याचं खोतकरांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंचा जो निर्णय असेल तो आपल्याला मान्य असेल. उद्धव ठाकरे माझ्या हिताचाच निर्णय घेतील. पण अद्याप माझ्यापर्यंत कोणताही निर्णय पोहोचलेला नाही, अशी माहिती अर्जुन खोतकरांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

दोन दिवसांपूर्वी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात अर्जुन खोतकर यांनी निवडणूक लढवावी या मागणीसाठी शेकडो शिवसैनिकांनी खोतकरांच्या घरी ठिय्या आंदोलन केलं होतं. दानवे आणि खोतकर वाद मिटवण्यासाठी अनेक बैठका झाल्या, तरी अद्याप जालन्यातून नेमकं कोण लढणार हा प्रश्न सुटला नसल्याचं दिसत आहे.