अहमदनगर: शिर्डी लोकसभा मतदारसंघातू ठाकरे गटाकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातील खासदार सदाशिव लोखंडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर भाऊसाहेब वाकचौरे यांचे नाव ठाकरे गटाकडून पुढे आलं आहे. तसेच नगरची जागा काहीही करून जिंकायचीच आहे, त्यामुळे तयारीला लागा असा आदेशही उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला आहे. शिवसेनेतल्या ठाकरे गटाच्या लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकांच्या दुसऱ्या दिवशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिर्डी, अहमदनगर, नाशिक आणि दिंडोरी या चार मतदारसंघाचा आढावा घेतला. या चार लोकसभा मतदारसंघात आपल्या पक्षाचं आव्हान कसं उभं करायचं यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली.


शिर्डी लोकसभा मतदारसंघात स्थानिक नेते आणि माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी इच्छा पदाधिकाऱ्यांनीच व्यक्त केली. त्यामुळं शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी भाऊसाहेब वाकचौरेंच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती आहे. वाकचौरे हे काँग्रेस आणि भाजपमध्ये काम करून पुन्हा शिवसेनेतल्या ठाकरे गटात घरवापसी करणार आहेत. त्यामुळं एकनाथ शिंदे समर्थक खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात भाऊसाहेब वाकचौरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाऊ शकतं.


भाऊसाहेब वाघचौरे यांचा 23 ऑगस्टला मातोश्री या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश होणार आहे. भाऊसाहेब वाकचौरे हे मूळ शिवसैनिक होते, मात्र 2019 च्या निवडणुकीत ते अपक्ष म्हणून लढले होते. भाजप, अपक्ष नंतर आता पुन्हा एकदा शिवसेनेत वाघचौरे यांची घरवापसी होत आहे. सध्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळावी अशी स्थानिक नेत्यांची पधाधिकार्‍यांची मागणी आहे. 


सुजय विखे पाटलांचा पराभव करायचा


अहमदनगर लोकसभा आपल्याला जिंकायचीच आहे, असा निर्धार आढावा बैठकीत करण्यात आला. विद्यमान खासदार सुजय विखे पाटलांचा आपल्याला पराभव करायचा आहे, त्यासाठी तयारीला लागा. महाविकास आघाडीचा उमेदवार कोणीही असो, एकत्र मिळून निवडणूक लढा आणि त्या उमेदवाराची साथ द्या, अशी सूचना उद्धव ठाकरेंनी दिली आहे.


माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांचा परिचय -



  • भाऊसाहेब वाकचौरे हे शिवसेनेचे माजी खासदार आहेत.

  • वाकचौरे यांनी 2009 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून रामदास आठवलेंचा पराभव केला होता.

  • 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेसमध्ये गेले होते. त्यांनी शिर्डी लोकसभा काँग्रेसकडून लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

  • त्यानंतर त्यांनी भाजपच्या तिकीटावर 2014 ची श्रीरामपूर विधानसभा निवडणूक लढवली. मात्र त्यावेळी पराभव झाला.

  • सध्या त्यांच्याकडे साईबाबा संस्थानचे विश्वस्तपद आहे. 

  • शिवसेना, काँग्रेस, भाजपा आणि आता अपक्ष असा वाकचौरे यांचा राजकीय प्रवास आहे.