सांगलीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक बैठक आज पार पडली आणि या बैठकीत उमेदवारी बदलण्याच्या विषयवार चर्चा झाली. त्यात प्रकाश शेंडगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून आज याची अधिकृत घोषणा होऊ शकते.
सांगली लोकसभा मतदारसंघात जवळपास चार लाखांच्या घरात धनगर समाजाचं मतदान होतं. प्रकाश शेंडगे यांची ओळख ही धनगर समाज आणि ओबीसी नेते म्हणून आहे. शिवाय जयसिंग शेंडगेंपेक्षा ते जास्त सक्रीय आहेत. त्यामुळे प्रकाश शेंडगे जर वंचित आघाडीचे उमेदवार जाहीर झाले तर सांगली लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांची डोकेदुखी वाढणार आहे.
सांगली लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवार जाहीर झाला आहे. मात्र भाजप उमेदवार संजय पाटील यांच्याविरोधात कोण याचा अजून घोळ अजूनही सुरु आहे. आधी सांगलीची जागा काँग्रेसला की स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हा तिढा होता. अखेर ही जागा स्वाभिमानीच्या वाट्याला जागा गेली. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे सक्षम उमेदवार नसल्याने उमेदवारांच्या बाबतीत चाचपणी सुरु आहे. भाजपचे बंडखोर नेते गोपीचंद पडळकर, वसंतदादा घराण्यातील विशाल पाटील की अन्य कोण? यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेत खल सुरु आहे.
प्रकाश शेंडगे हे जयसिंग शेंडगे यांचे चुलत बंधू आहेत. धनगर आरक्षण लढ्याच्या माध्यमातून प्रकाश शेंडगे यांच्या कामामुळे त्यांची उमेदवारी फायनल करण्यात येणार असून शनिवारी याची अधिकृत घोषणा होणार आहे. "धनगर समाजाला राज्याच्या एकाही पक्षाने या निवडणुकीमध्ये संधी दिली नाही. वंचित बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून संधी मिळाल्यास या सरकारविरोधात लढण्यास तयार आहोत," असं प्रकाश शेंडगे यांनी जाहीर केलं आहे. आता प्रकाश शेंडगे यांच्या उमेदवारीमुळे सांगली लोकसभा निवडणुकीत आणखी चुरस वाढणार आहे.