मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 मतदारसंघांचा समावेश आहे. उदयन राजे, राजू शेट्टी, धनंजय महाडिक, विनायक राऊत, सुप्रिया सुळे, चंद्रकांत खैरे यासारख्या दिग्गजांचं भवितव्य मतयंत्रांमध्ये बंद होणार आहे. निवडणुकांच्या तोंडावर सतत चर्चेत राहिलेल्या माढा, अहमदनगर, जालना, सातारा, जळगाव या जागांचा समावेश या टप्प्यात आहे. देशभरातील 15 राज्यांमधल्या 116 जागांसाठी मतदान होईल.


पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, बारामती, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, रावेर, अहमदनगर, मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद, कोकणातील रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या 14 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.

या टप्प्यात दोन कोटी 57 लाख 89 हजार 738 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये एक कोटी 33 लाख 19 हजार 10 पुरुष तर एक कोटी 24 लाख 70 हजार 76 महिला आणि 652 इतर नागरिक मतदान करणार आहेत.

तिसऱ्या टप्प्यात 249 उमेदवारांमध्ये 19 महिला उमेदवार आहेत. बारामती मतदारसंघात सर्वाधिक (चार) महिला उमेदवार आहेत. पुणे आणि माढा मतदारसंघात सर्वाधिक (प्रत्येकी 31) उमेदवार असून सर्वात कमी (9) उमेदवार सातारा मतदारसंघात निवडणुकीसाठी उभे आहेत.

तिसऱ्या टप्प्यासाठी 56 हजार 25 बॅलेट युनिट तर 35 हजार 562 कंट्रोल युनिट आहेत. 37 हजार 524 व्हीव्हीपॅट यंत्रे या चौदा मतदार संघात देण्यात आली आहेत. एकूण 1 लाख 41 हजार 113 कर्मचारी नियुक्त असून 17 हजार 192 कर्मचारी राखीव आहेत.

ऐनवेळी अपेक्षित उमेदवारांचं कापलेलं तिकीट, दुसऱ्या पक्षातील 'आयारामां'ना दिलेली उमेदवारी, त्यावरुन झालेले रुसवे-फुगवे यामुळे यापैकी बहुतांश मतदारसंघ चर्चेत राहिले होते. सगळ्याच पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे प्रचारही जोरदार झाला. आता मतदारराजा ईव्हीएमचं बटण दाबून कुणाला कौल देतो, यावरच दिग्गजांचं भवितव्य अवलंबून असणार आहे.

तिसऱ्या टप्प्यातील रंगतदार लढती

पुणे : गिरीश बापट (भाजप) vs मोहन जोशी (काँग्रेस)
बारामती : कांचन कुल (भाजप) vs सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी) 
माढा : रणजितसिंह नाईक निंबाळकर  (भाजप) vs संजय शिंदे (राष्ट्रवादी)
सांगली : संजय पाटील  (भाजप) vs विशाल पाटील (स्वाभिमानी शेतकरी संघटना - महाआघाडी)
सातारा :  नरेंद्र पाटील (शिवसेना) vs उदयनराजे भोसले  (राष्ट्रवादी)
कोल्हापूर :  संजय मंडलिक (शिवसेना) vs धनंजय महाडिक (राष्ट्रवादी)
हातकणंगले : धैर्यशील माने (शिवसेना) vs राजू शेट्टी  (स्वाभिमानी शेतकरी संघटना - महाआघाडी)
जळगाव :  उन्मेष पाटील (भाजप) vs गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी)
रावेर :  रक्षा खडसे (भाजप) vs उल्हास पाटील (काँग्रेस)
अहमदनगर :  सुजय विखे (भाजप) vs संग्राम जगताप (राष्ट्रवादी)
जालना :  रावसाहेब दानवे (भाजप) vs विलास औताडे (काँग्रेस)
औरंगाबाद :  चंद्रकांत खैरे  (शिवसेना) vs सुभाष झांबड (काँग्रेस)
रायगड :  अनंत गीते  (शिवसेना) vs सुनिल तटकरे (राष्ट्रवादी)
रत्नागिरी-सिंधुदुर्ग :  विनायक राऊत  (शिवसेना) vs नवीनचंद्र बांदिवडेकर (काँग्रेस) vs निलेश राणे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष)

महाराष्ट्रासह आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, गोवा, जम्मू काश्मिर, कर्नाटक, केरळ, ओदिशा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल ही तेरा राज्य आणि दादरा नगर हवेली, दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशांतील 116 मतदारसंघांमध्ये मतदान होईल. गुरुवार 23 मे 2019 रोजी निकाल जाहीर होणार आहे.

तिसरा टप्पा - (115)

आसाम - 4
बिहार - 5
छत्तीसगड - 7
गुजरात - 26
गोवा - 2
जम्मू काश्मिर - 1
कर्नाटक- 14
केरळ - 20
महाराष्ट्र - 14
ओदिशा - 6
त्रिपुरा - 1
उत्तर प्रदेश- 10
पश्चिम बंगाल - 5
दादरा नगर  - 1
दमण - दीव - 1

भाजपाध्यक्ष अमित शाह हे पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरले असून गांधीनगरमधून त्यांचा फैसला होईल. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे पहिल्यांदाच वायनाडमधून निवडणूक लढवणार आहेत. याशिवाय मुलायम सिंह यादव, पप्पू यादव, संबित पात्रा यासारख्या दिग्गजांचं भवितव्य पणाला लागणार आहे.