आतापर्यंत केसांचा चौकीदार, आता देशाचाही चौकीदार, हेअरस्टाईलिस्ट जावेद हबीब भाजपमध्ये
एबीपी माझा वेब टीम | 22 Apr 2019 09:39 PM (IST)
'कोणालाही आपल्या पार्श्वभूमीची लाज वाटता कामा नये. जर पंतप्रधान आपण चहावाला होतो, हे अभिमानाने सांगतात, तर मी न्हावी असल्याचं सांगताना का लाजू?' असा सवालही जावेद हबीब यांनी विचारला.
मुंबई : भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेण्यासाठी अनेक सेलिब्रेटी धडपडताना दिसत आहेत. त्यातच आता सेलिब्रेटींचे हेअरस्टाईलिस्ट असलेले जावेद हबीब यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 'आतापर्यंत मी केसांचा चौकीदार होतो, आता मी देशाचाही चौकीदार झालो' अशा भावना जावेद यांनी पक्षप्रवेशाच्या वेळी व्यक्त केल्या. देशभरात तिसऱ्या टप्प्यातील मतदान होण्याच्या आदल्याच दिवशी जावेद हबीब यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 'भाजपमध्ये प्रवेश केल्याचा मला आनंद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षात केलेले बदल मी अनुभवले आहेत.' अशा शब्दात जावेद यांनी मोदींवर स्तुतिसुमनंही उधळली. 'कोणालाही आपल्या पार्श्वभूमीची लाज वाटता कामा नये. जर पंतप्रधान आपण चहावाला होतो, हे अभिमानाने सांगतात, तर मी न्हावी असल्याचं सांगताना का लाजू?' असा सवालही जावेद हबीब यांनी विचारला. जावेद हबीब हे प्रसिद्ध हेअर स्टाईलिस्ट असून 24 राज्यांमधील 110 शहरांमध्ये त्यांची सलून्स पसरली आहेत. जावेद हबीब यांच्या 'हेअर एक्स्प्रेसो'ची 846 आऊटलेट्स असून जवळपास 15 लाख नियमित ग्राहक असल्याची माहिती आहे.