पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेल्या राहुल शेवाळे यांना धमकी दिल्याची कथित ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. मात्र हे माझ्याविरोधात षडयंत्र असून मी राहुल शेवाळेच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.


सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीचे युवकचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल शेवाळे यांना धमकी दिल्याची कथित ऑडीओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. या कथित ऑडीओ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मात्र निवडणुका तीन दिवसांवर आल्या असताना अशा पद्धतीने माझ्यावर खोटा आरोप केला जात आहे, असे सुळे म्हणाल्या.


आमच्या पक्षातून अनेक जण भाजपमध्ये गेलेत ते काही एकटेच नाहीत, असे सुळे यांनी म्हटले आहे. एक महिला आहे म्हणून अशा पद्धतीने घाण राजकरण केले जात आहे. मी जर धमकी दिली असेल तर त्यांनी माध्यमांकडे जाण्याची गरज नव्हती पोलीस स्टेशनला का गेले नाहीत? असा सवालही सुळे यांनी केला आहे.

माझ्या विरोधात त्यांच्याकडे काहीच नाही, त्यामुळे खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केलं जात आहे. मी मानहानीचे केस दाखल करणार आहे, त्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल, असे त्या म्हणाल्या.जर त्यांना भीती वाटत होती तर ते पोलीस स्टेशनला का गेले नाहीत. एक महिला यशस्वी होतेय हे त्यांना बघवत नाही. माझी बोलायची पद्धत अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. माझं काम पाहिलेलं आहे. मी माझा सुसंस्कृतपणा सोडलेला नाही, असेही सुळे यांनी सांगितले.

काय आहे कथित ऑडीओ क्लिपमध्ये
या ऑडीओ  क्लिपमध्ये सुप्रिया सुळे यांनी फोनवरून शेवाळे यांना धमकी दिल्याचा दावा केला जात आहे. यामध्ये 'तुम्ही भाजपात गेलाय, हे ठीक आहे.. एक लक्षात ठेवा, राहुल शेवाळे सुप्रिया सुळेच्या नादी लागू नका. मी कॉन्ट्रॅक्टर नाही, घरात येऊन ठोकून काढेन. आय ऍम सिरियस. माझी बदनामी केली ना, तर अब्रुनुकसानीचा दावा करेल. तुम्ही सगळे उलटतायत आता. माझ्यासारखी वाईट बाई नाही, मी खरी बाई आहे लक्षात ठेवा.. रेकॉर्ड केलं तरी चालेल..' असे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं असल्याचा दावा केला आहे. मात्र हे आरोप सुळे यांनी फेटाळून लावले आहेत. या विरोधात शेवाळे यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखला करणार असल्याचे सुळे यांनी सांगितले आहे.