नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले अभिनेते, खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान असावा तर अखिलेश यादव किंवा मायावती यांच्या सारखा, असं वक्तव्य केलं आहे. शत्रुघ्न सिन्हा यांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.


उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि बसपा प्रमुख मायावती यांच्यामध्ये पंतप्रधानपदी काम करण्याची क्षमता आणि गुण आहेत. काम करण्याची तत्परता आहे, असं शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं.


अखिलेश यादव यांच्यात काम करण्याची खुप क्षमता आहे. ते युवा शक्तीचं प्रतीक आहेत. त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशात चांगलं काम केलं आहे. मी त्यांना केवळ उत्तर प्रदेशचं भविष्य नाही, तर देशाच्या भविष्यातील नेतृत्तवाच्या रुपात, पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून पाहतो, अशा शब्दात शत्रुघ्न सिन्हा यांनी अखिलेश यादव यांची स्तुती केली.


शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा यांनी लखनौमधून समाजवादी पार्टीकडून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याठिकाणी पूनम सिन्हा यांचा मुकाबला केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी आहे. तर शत्रुघ्न सिन्हा यांना बिहारच्या पटना साहिबमधून काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. याठिकाणी शत्रुघ्न सिन्हा यांचा सामना भाजपच्या केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याशी होणार आहे.