राज ठाकरे यांची आज सोलापुरात प्रचारसभा झाली. या सभेत त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. सभेनंतर ते हॉटेलमध्ये परतले. तर शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारासाठी मंगळवेढ्यात जाणार आहेत. त्यामुळे पवारांनी हॉटेल बालाजी सरोवर इथेच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला.
शरद पवार हॉटेलबाहेर पोहोचताच मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना राज ठाकरे इथेच मुक्कामी असल्याचं सांगितलं. तर पवारांनी राज ठाकरेंची सभा कशी झाली याची विचारपूस केली. परंतु दोन्ही नेते एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी असले तरी त्यांची भेट होण्याबाबत साशंकता आहे.
दरम्यान याआधी 22 मार्च रोजी राज ठाकरे यांनी मुंबईतील सिल्व्हर ओक इथे जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती. बंदखोली आड दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती.
दुसरीकडे 19 मार्च रोजी राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला होता. पक्ष निवडणूक लढवणार नसला तरी नरेंद्र मोदी आणि अमित शाह या जोडगोळीविरोधात प्रचार करणार आहे. याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला होणार असेल तर होऊ दे, असं राज ठाकरे म्हणाले होते.