कोलकाता : लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात 59 जागांवर मतदान सुरु आहे. पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हिंसाचाराच्या घटना समोर आल्या आहेत. उत्तर दिनाजपूरमधील बमबारी आणि दक्षिण चौबीस परगना जिल्ह्यातील जयनगर परिसरात भाजप कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 9 जागांसाठी आज मतदान होत आहे. मतदानादरम्यान तृणमूल आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांवर हल्ला केल्याचे आरोप करत आहेत. याशिवाय दमदम मतदारसंघातील एका निवडणूक अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन झाल्याचा प्रकारही समोर आला आहे. घटनेनंतर घाबरलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांना रडू कोसळलं.
भाजप उमेदवाराच्या गाडीवर हल्ला
डायमंड हार्बर लोकसभा जागेवर अभिषेक बॅनर्जी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अभिषेक बॅनर्जी ममता बॅनर्जी यांचे भाचे असून ते याठिकाणी तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आहेत. अभिषेक यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार निलांजन रॉय निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काही लोकांनी निलांजन यांच्या गाडीवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. लोकसभा क्षेत्र डोंगरिया परिसरातील ही घटना आहे.
दुसरीकडे जाधवपूरमध्ये भाजपचे उमेदवार अनुपम हाजराने आरोप केले की तृणमूलचे कार्यकर्ते अनेक ठिकाणी गोंधळ घालत आहेत आणि भाजप कार्यकर्त्यांना मारहाण करत आहेत. तृणमूलच्या गुंडांनी भाजप कार्यकर्त्याच्या गाडीवर हल्ला केल्याचा आरोप अनुपम हाजराने केला आहे. या हल्ल्यामध्ये आम्ही आमच्या तीन पोलिंग एजंटचे जीव वाचवले आहेत. तृणमूलचे गुंड 52 बूथवर गडबडी करत आहेत. लोक भाजपला मतदान करण्यास उत्सुक आहेत, मात्र तसं करु दिलं जात नाही, असं हाजरा यांनी म्हटलं.
भाजपचे उमेदवार बाबूल सुप्रियोंना धक्काबुक्की
भाजप नेते आणि गायक बाबुल सुप्रियो यांच्यात आणि तृणमुलच्या कार्यकर्त्यांमध्येही वाद झाला. मतदान करण्यासाठी गेलेल्या बाबुल सुप्रियो यांना तृणमुलच्या कार्यकर्त्यांनी रोखल्याचा आरोप केला जात आहे. त्यावरुन दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. याआधी काही दिवसांपूर्वी तृणमुलच्या कार्यकर्त्यांनी बाबुल सुप्रियो यांच्या वाहनाची तोडफोड केली होती. दरम्यान बाबुल सुप्रिया यांना धक्काबुक्की झाल्यांचही समोर आलं आहे.
VIDEO | भाजपचे उमेदवार बाबूल सुप्रियोंना धक्काबुक्की | कोलकाता