लखनौ  : काँग्रेस नेते आणि अभिनेते  शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा यांनी आज लखनौमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. समाजवादी पार्टीकडून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांचा मुकाबला केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी आहे. पूनम सिन्हा यांनी आज रोड शो करत आपला अर्ज भरला. यावेळी त्यांच्यासोबत शत्रुघ्न सिन्हा, डिम्पल यादव देखील उपस्थित होत्या. लखनौमधून पूनम सिन्हा लढत असल्यामुळं काँग्रेसने इथे आपला उमेदवार दिलेला नाही,

पूनम यांच्याकडे जातीच्या गणितासह स्टारडम या दोन मजबूत बाबी मानल्या जात आहेत. मात्र या मतदारसंघात भाजपचा मोठा प्रभाव आहे. 28 वर्षांपासून हा मतदारसंघ भाजपकडे आहे. गेल्या वेळेला राजनाथ सिंह यांनी 54 टक्के मतं घेत विजय संपादित केला होता.

लखनौत कालच पूनम सिन्हा यांनी समाजवादी पक्षात खासदार डिंपल यादव यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. यानंतर लगेचच पूनम सिन्हा यांना सपा-बसपा आघाडीकडून लखनौतून तिकीट जाहीर झाले.  लखनौत पाचव्या टप्प्यात 6  मे रोजी मतदान होत आहे.  काँग्रेस येथे उमेदवार देणार नसून, पूनम सिन्हा यांना पाठिंबा देऊ शकते.

सपा-बसपाने पूनम सिन्हाविरोधात काँग्रेसने उमेदवार देऊ नये अशी भूमिका घेतली आहे. त्याला काँग्रेस सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.   पूनम यांचे पती शत्रुघ्न सिन्हा पाटण्यातून काँग्रेसकडून मैदानात आहेत. शत्रुघ्न सिन्हा मध्यंतरी अखिलेश यादव यांची भेट घेऊन पत्नीसाठी लखनौतून उमेदवारी मागितली होती. त्यानुसार सिन्हा यांनी सपात प्रवेश केला आहे.

लखनौतून भाजपकडून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह मैदानात उतरले आहेत. राजनाथ सिंह आणि पूनम सिन्हा यांच्यात सरळ लढत थेट होणार आहे.