बारामती : राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांची माळेगावात सभा सुरु होती. सभा रंगत असताना रोडवरुन भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचाराच्या दोन गाड्या लागोपाठ आल्या. दोन्ही गाड्यांतून भाजपच्या दोन्ही उमेदवारांचा प्रचार सुरु होता.


भाजपच्या प्रचाराच्या गाड्या आल्या त्यावेळी अजित पवारांनी त्यांचं भाषण थांबवलं. त्यानंतर अजित पवारांना आपळ्या खास शैलीत त्यावर टिप्पणी केली. "अजित पवार काय म्हणतायेत हे ऐकायला ते आले आहेत. आरं अजित पवार बोलतो ते ऐकल्यावर तू सुद्धा घड्याळाचं बटन दाबशील. माईकवर पण तू सांगशिल आता ती (कमळाच नाव न घेता) नको घड्याळ घड्याळ घड्याळ", असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. त्यानंतर सभेत एकच हशा पिकला.



बारामतीकरांनो या निवडणुकीत असं उत्तर द्या की पुन्हा सत्ताधारी भाजप नेत्यांनी बारामतीकडे फिरकलंच नाही पाहिजे. ते म्हटले पाहिजेत नको रे बारामतीच्या नादाला लागायला, अशा खास शैलीत अजित पवारांनी बारामतीकरांना आवाहन केलं. बारामतीला दृष्ट लागायला नको म्हणून ते आले की उलटी बाहुली टांगा, असा सल्लाही अजित पवारांनी उपस्थितांना दिला.