नवी दिल्ली : माजी क्रिकेटर आणि पूर्व दिल्ली लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचा उमेदवार गौतम गंभीर याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह प्रतिस्पर्धी उमेदवार आतिशी मारलेना यांच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे. ही माहिती गंभीरने स्वतः पत्रकार परिषदेत दिली आहे.

रविवार, 12 मे रोजी दिल्लीमध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडत आहेत. या पार्श्वभूमीवर इथले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गंभीरने प्रतिस्पर्धी उमेदवार आतिशी यांच्याविरोधात वादग्रस्त पत्रकं वाटली असल्याचा आरोप आपकडून करण्यात आला होता.

हे सर्व आरोप गौतम गंभीरने फेटाळून लावले आहेत. जर तुमचे आरोप खरे असतील तर माझ्याविरोधात केस का दाखल केली नाही? असा प्रश्न करत जर हे आरोप खरे असतील तर मी राजकारण सोडून देईल, असे गंभीर म्हणाला.

दरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, आतिशी मारलेना यांच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकला असल्याचेही गंभीरने सांगितले आहे. राजकारणात अरविंद केजरीवालसारखे लोक असल्यानेच चांगली लोकं राजकारणात येत नाहीत, असे गंभीरने म्हटले आहे.

गंभीरने म्हटले आहे की, मी जर दोषी असेल तर माझ्याविरोधात खटला दाखल करावा. मला लाज वाटते की अरविंद केजरीवाल माझ्या राज्याचे मुख्यमंत्री आहे. माझ्या घरी पाच महिला आहेत. मला महिलांचा आदर राखायला येतो. अशा प्रकारची घटना कुठल्याही महिलेसोबत होऊ नये, असे गंभीर म्हणाला.


काय आहे प्रकरण ?

गौतम गंभीरने अपमानित करणारे पत्रक वाटले असा आरोप काल पूर्व दिल्लीच्या आप उम्मीदवार आतिशी यांनी गौतम गंभीरवर लावला होता. यावेळी पत्रकार परिषदेत आतिशी रडल्या देखील होत्या. गंभीरने वर्तमानपत्रांमध्ये घालून ही पत्रकं वाटली असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला होता.

याआधी गौतम गंभीरविरोधात आम आदमी पार्टीने तीस हजारी कोर्टात तक्रार दाखल केली होती. मतदार यादीत गौतम गंभीरचे नाव दोन वेळा नोंदवण्यात आले असून त्याच्याकडे दोन मतदार ओळखपत्र असल्याचा दावा आम आदमी पार्टीचा केला होता.