मुंबई : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंनी स्वत: निवडणुकीत उभं राहावं असं आव्हान मनोहर जोशींना दिलं आहे. मनसे यंदा लोकसभा निवडणूक लढवत नाहीये, मात्र राज ठाकरे राज्यात विविध ठिकाणी सभा घेत आहेत. नरेंद्र मोदी, अमित शाह यांना आणि त्यांच्या मित्र पक्षांना मतदान करु नका, असं आवाहन राज ठाकरे मतदारांना करत आहेत.


राज ठाकरेंच्या भूमिकेवरुन मनोहर जोशींना त्यांच्यावर निशाणा साधला. भातावर माशी बसली तर भात खराब होत नाही. राज ठाकरेंना निवडणूक लढण्यास कुणी अडवलं आहे? राज ठाकरेंनी स्वत: निवडणुकीत उभं राहावं. राज ठाकरे राहुल शेवाळेंच्या विरोधात जरी उभे राहिले तरी निवडून येणार नाहीत, असा टोला मनोहर जोशींनी लगावला. तसेच याठिकाणी राहुल शेवाळे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वासही मनोहर जोशींनी यावेळी व्यक्त केला.


राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांमध्ये कुठेही शिवसेनेवर थेट टीका केली नाही. मात्र भाजपच्या मित्रपक्षांना मतदान करु नका असं आवाहन मतदारांना केलं. राज्यात शिवसेना भाजपचा प्रमुख मित्रपक्ष हे सर्वांना माहित आहे, त्यामुळे शिवसेनेलाही मतदान न करण्याचं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.


राज ठाकरे यांच्या नांदेड, सोलापूर, सातारा, इचरकंरजी, पुणे, महाड याठिकाणी जाहीर सभा झाल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात राज ठाकरे 23, 24, 25, 26 एप्रिलला अनुक्रमे मुंबई, नवी मुंबई आणि नाशिकमध्ये सभा घेणार आहेत. त्यामुळे या सभांमध्ये राज ठाकरे मनोहर जोशी यांच्या टीकेला उत्तर देत, शिवसेनेला टार्गेट करणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.


VIDEO | विधानसभेत महाआघाडी मनसेला जागा सोडणार? | स्पेशल रिपोर्ट