पालघर : पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीला जबरदस्त झटका बसला आहे. निवडणूक आयोगाने त्यांचं 'शिट्टी' हे निवडणूक चिन्हंच गोठवलं आहे. याचा सर्वात मोठा फायदा थेट शिवसेनेला मिळणार आहे. पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध बहुजन विकास आघाडी असाच थेट सामना होत आहे. मात्र मतदानापूर्वीच बहुजन विकास आघाडीचं ओळख असलेलं 'शिट्टी' हे निवडणूक चिन्हं निवडणूक आयोगाने गोठवलं आहे.


पालघरमध्ये बहुजन महापार्टीच्या उमेदवारानेही 'शिट्टी' या निवडणूक चिन्हासाठी आग्रह धरला होता. मात्र या संदर्भातला वाद चिघळल्यावर बहुजन विकास आघाडीने मुंबई हायकोर्टात दाद मागितली. मुंबई हायकोर्टाने वाद निवडणूक आयोगाकडेच सोपवून निर्णय घेण्याचा अधिकार दिला. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाचंही दार ठोठवण्यात आलं. पण पडद्यामागून शिवसेनेचे ठाण्यातील दिग्गज नेते एकनाथ शिंदे, भाजपचे रविंद्र चव्हाण आणि 'मातोश्री'चे चाणक्य मिलिंद नार्वेकर यांनी किल्ला लढवल्याने, आज पहाटे पालघर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 'शिट्टी' हे निवडणूक चिन्हं कोणालाच न देण्याचा निर्णय जाहीर केला.

याचा सर्वात मोठा फटका बहुजन विकास आघाडीला बसणार आहे. तर थेट फायदा शिवसेनेच्या उमेदवाराला मिळणार आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णय प्रक्रियेत दगा फटका होऊ नये यासाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी रात्रभर तळ ठोकला होता. मात्र अखेर बहुजन विकास आघाडीची 'शिट्टी' काही वाजलीच नाही. त्यामुळे त्यांना आता मतदारांकडे नवीन निवडणुक चिन्ह पोहोचवण्याची कसरत करावी लागणार आहे.

'शिट्टी'ऐवजी 'रिक्षा' चिन्हं
दरम्यान 'शिट्टी' हे चिन्ह गोठवल्याने बहुजन विकास आघाडीला 'रिक्षा' हे चिन्ह बहाल करण्यात आलं आहे. बहुजन महापार्टीच्या एका उमेदवाराला पक्षाकडून एबी फॉर्म मिळाला नाही म्हणून तर दुसऱ्याच्या अर्जात काही त्रुटी असल्याने दोघांचे अर्ज बाद झाले. तरीही बहुजन महापार्टीने 'शिट्टी' हे चिन्ह सोडलेलं नव्हतं. अखरे निवडणूक अधिकाऱ्यांनी शिट्टी हे चिन्हंच गोठवल्याने बहुजन विकास आघाडीला दुसरं चिन्हं घ्यावं लागलं.