मुंबई : शिवसेना आणि भाजप युतीमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडल्याचं चित्र आहे. कारण युवासेना आणि उत्तर मध्य मुंबईच्या भाजप उमेदवार पूनम महाजन यांच्यात वाद सुरु आहे. पूनम महाजन यांच्या बॅनरवर आदित्य ठाकरे यांचा फोटो नसल्याने युवासेना नाराज आहे.
आदित्य ठाकरे हे देशाचे युथ आयकॉन आहेत. त्यांचा अपमान हा आम्हा शिवसैनिकांचा अपमान आहे. उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार पूनम महाजन यांच्या बॅनरवर आदित्य ठाकरेंना डावललं जात आहे. या वृत्तीचा जाहीर निषेध करत आहे. त्यामुळे पूनम महाजन चूक मान्य करेपर्यंत भाजपच्या प्रचारावर बहिष्कार टाकत आहोत. युवासैनिक पूनम महाजन यांच्या कुठलीही सभा आणि प्रचाराला उपस्थित राहणार नाहीत, अशी भूमिका युवासेनेने घेतली आहे.
तसंच पूनम महाजन यांचा निषेध करण्यासाठी आज संध्याकाळी पाच वाजता युवासैनिक वांद्र्यातील शाखेत एकवटणार आहेत.