नांदेड : आज मनसेची अवस्था काय आहे हे सर्वांना माहिती आहे. मनसेची अवस्था ही उनसे अर्थात उमेदवार नसलेली सेना अशी झाली आहे. राज ठाकरे लग्न दुसऱ्याचं असताना स्वतः नाचत आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला.


राज्यात पाण्याची स्थिती गंभीर आहे, मग तुम्ही पाण्यासाठी काय उपाययोजना केल्या असे सांगत एकीकडे महाराष्ट्र गोदावरीच्या पाण्यासाठी भांडत आहे आणि दुसऱ्या मार्गाने गोदावरीचं पाणी गुजरातला वळवलं जात आहे, असा आरोप राज ठाकरेंनी केला होता. सोबतच फडणवीस हे बसवलेले मुख्यमंत्री असल्याची टीकाही ठाकरे यांनी केली होती. यावर मुख्यमंत्र्यांनी आज जोरदार टीका केली.

UNCUT | नांदेडमध्ये राजगर्जना, राज ठाकरेंचं नांदेडच्या सभेतील संपूर्ण भाषण | एबीपी माझा



नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर यांच्या समर्थनार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते.  मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राज ठाकरे यांना निवडणूक लढवायची नाही. त्यामुळं ते काहीही बोलत आहेत. त्यांना कुणाला काही पुरावाच द्यायचा नाही. राज ठाकरे यांनी माझ्यावर बसवलेले मुख्यमंत्री असल्याची टीका केली. मात्र मला जनतेने मुख्यमंत्रीपदावर बसवलं. तुम्हाला मात्र घरी बसवलं. तुमचा सुपडा साफ केला, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

राज ठाकरेंची अवस्था आधे इधर आधे उधर बाकी मेरे पीछे आव, अशी झाली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. अभ्यास न करता ठाकरे आरोप करत असतात.  महाराष्ट्राच पाणीगुजरात दिलं  असा आरोप ठाकरे यांनी केला. मात्र महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देण्याचा करार अशोक चव्हाणांनी केला. तो नारपारचा करार या पठ्ठ्याने रद्द करूनराज्याचं  हक्काचं पाणी आणलं, असे मुख्यमंत्री म्हणाले.

काही वर्षांपूर्वी अशोक चव्हाण म्हणायचे राज ठाकरे डराव डराव करतात, आता मात्र त्यांनाच किरायाने आणले आहे, असा आरोपही त्यांनी केला. अशोकरावांना सभेसाठी किरायाने लोकं आणावी लागतात. आम्ही मंच किरायाने आणतो हे लोक किरायाने आणतात.  आता तर त्यांनी नेता देखील किरायाने आणला. आपल्या समर्थनार्थ किरायाने नेता आणण्याचा पॅटर्न आणला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.