यवतमाळ / भंडारा : लोकसभा निवडणुकीचा रोमांच शिगेला पोहोचला आहे. विदर्भातील 7 लोकसभा मतदारसंघात लोकसभेसाठी मतदान सुरु आहे. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने अगदी उन्हाच्या तडाख्यात देखील आपला मतदानाचा अधिकार बजावत आहेत. दरम्यान यवतमाळ येथे एका नवरीने तर दुसरीकडे भंडारा येथे नवरदेवाने आपल्या लग्नाच्या आधी आपला मतदानाचा अधिकार बजावला.

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील पायल डहाके या मुलीचा आज आर्णी तालुक्यातील दाभडी येथे विवाह आहे. यावेळी नवरी असलेल्या पायलने लग्नघटिकेच्या आधी मतदान केले. पायल मतदान करून लग्नाच्या मंडपात आली. मतदान करने आवश्यक आहे त्यामुळे पहिले मतदान आणि नंतर संसाराला सुरुवात करत असल्याचे पायल हिने एबीपी माझाशी बोलताना सांगितले.

दुसरीकडे, भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील इंदौरा येथील नवरदेवाने देखील लग्नापूर्वी मतदान केंद्रावर येऊन आधी मतदानाचा हक्क बजवला. लाखांदूर तालुक्यातील इंदौरा येथील नवरदेव पितांबर जेंगठे यांचा विवाह गडचिरोली येथील सावंगी गावात आहे. लोकशाहीला मजबूत करण्यासाठी मतदान करने आवश्यक असल्याचे सांगत पितांबरने आपली वरात सुरुवातीला इंदौरा येथील मतदान केंद्रवर वळविली.  मतदान केंद्र गाठत त्याने आधी मतदान केले आणि नंतर तो आपल्या लग्नस्थळी निघाला. यावेळी वाजतगाजत नवरदेव मतदान करण्यासाठी केंद्राकडे येत असल्याने त्याला बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.

तर वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्याच्या सावल येथे राहणाऱ्या किशोर तुकाराम मानमोडे यांचंही आज लग्न होतं. नागपूर जिल्ह्यातील जुनापाणी चौकी येथे हा लग्नसोहळा  होता. त्यापूर्वी सकाळी सावल येथे वरात निघाल्यानंतर नवरदेव किशोर मानमोडे यांनी विवाहापूर्वी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

गोंदियाच्या कांरजा गावात राहणाऱ्या देवीदास उराडे या नवरदेवाने देखील थेट मतदान केंद्रावर आपली फिरती वरात घेऊन जात मतदान केले.

विदर्भातील मतदान टक्केवारी : दुपारी एक वाजेपर्यंत 

▶️वर्धा 30.22 टक्के

▶️रामटेक - 23.29 टक्के

▶️नागपूर - 27.47 टक्के

▶️भंडारा-गोंदिया - 32.02

▶️चंद्रपूर - 30.5 टक्के

▶️गडचिरोली-चिमुर 42 टक्के

▶️यवतमाळ-वाशिम - 26.9 टक्के

राज्यातील पहिल्या टप्प्यातील प्रमुख लढती (07)

नागपूर - नितीन गडकरी (भाजप) VS नाना पटोले (काँग्रेस)

वर्धा - रामदास तडस (भाजप) VS चारुलता टोकस (काँग्रेस) VS अॅड. धनंजय वंजारी (वंचित बहुजन आघाडी)

यवतमाळ-वाशिम - भावना गवळी (शिवसेना) VS माणिकराव ठाकरे (काँग्रेस)

गडचिरोली-चिमुर अशोक नेते (भाजप) VS नामदेव उसेंडी (काँग्रेस)

चंद्रपूर - हंसराज अहिर (भाजप) VS बाळू धानोरकर (काँग्रेस) 

रामटेक - कृपाल तुमाणे (शिवसेना) VS किशोर गजभिये (काँग्रेस) 

भंडारा-गोंदिया - सुनील मेंढे (भाजप) VS नाना पंचबुद्धे (राष्ट्रवादी)