- अशा असतील चौथ्या टप्प्यातील प्रमुख लढती
- धुळे - सुभाष भामरे (BJP) विरुद्ध कुणाल रोहिदास पाटील (CONG)
- नंदुरबार - हीना गावित (BJP) विरुद्ध के. सी. पडवी (CONG)
- मावळ- पार्थ पवार(NCP) विरुद्ध श्रीरंग बारणे( SENA)
- शिरुर- अमोल कोल्हे (NCP) विरुद्ध शिवाजीराव आढळराव (SENA)
- शिर्डी- भाऊसाहेब कांबळे (CONG) विरुद्ध सदाशिव लोखंडे (SENA)
- दिंडोरी - डॉ भारती पवार (BJP) विरुद्ध धनराज महाले (NCP) विरुद्ध जे पी गावीत (माकप)
- नाशिक- हेमंत गोडसे (SENA) विरुद्ध समीर भुजबळ (NCP)
- पालघर - राजेंद्र गावित (SENA) विरुद्ध बळीराम जाधव (BVA)
- भिवंडी - कपिल पाटील (BJP) विरुद्ध सुरेश टावरे (CONG)
- कल्याण - बाबाजी पाटील (NCP) विरुद्ध डॉ. श्रीकांत शिंदे (SENA)
- ठाणे- आनंद परांजपे (NCP) विरुद्ध राजन विचारे (SENA)
- मुंबई उत्तर - उर्मिला मातोंडकर (CONG) विरुद्ध गोपाळ शेट्टी (BJP)
- मुंबई उत्तर पश्चिम- गजानन कीर्तिकर (SENA) विरुद्ध संजय निरुपम (CONG)
- मुंबई उत्तर-पूर्व - संजय दिना पाटील (NCP विरुद्ध मनोज कोटक (BJP)
- मुंबई उत्तर मध्य - पूनम महाजन (BJP) विरुद्ध प्रिया दत्त (BJP)
- मुंबई दक्षिण मध्य - राहुल शेवाळे (SENA) विरुद्ध एकनाथराव गायकवाड (CONG)
- मुंबई दक्षिण - अरविंद सावंत (SENA) विरुद्ध मिलिंद देवरा (CONG)
मुंबई उपनगर जिल्ह्यातील 4 लोकसभा मतदार संघात 86 उमेदवार, 5उमेदवारांची माघार
मुंबई उपनगर जिल्ह्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत 5 उमेदवारांनी माघार घेतली असूनज्यामुळे आता मुंबई उपनगर जिल्ह्यातील 4 लोकसभा मतदारसंघांत एकूण 86 उमेदवार आहेत. यानुसार आता मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून 18, मुंबई उत्तर पश्चिम (वायव्य) लोकसभा मतदारसंघातून 21, मुंबई उत्तर पूर्व(ईशान्य) लोकसभा मतदारसंघातून 27 आणि मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून 20 उमेदवार असणार आहेत.
मुंबई शहर जिल्ह्यातील दोन मतदारसंघात 30 उमेदवार
मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघासाठी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही मतदार संघात मिळुन प्रत्येकी दोन उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे एकुण 30 उमेदवार आता रिंगणात आहेत. मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघात आता 17 उमेदवार आहेत. मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात 13 उमेदवार रिंगणात आहेत.
शिर्डी लोकसभा मतदारसंघ
शिर्डी लोकसभा मतदारसंघात आता 20 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाआघाडीकडून काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे आणि महायुतीकडून शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांच्यामध्ये मुख्य लढत असली तरी भाकप आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रिंगणात असल्याने शिर्डीत चुरस पाहायला मिळणार आहे. इथे बंडखोरी रोखण्यात भाजपला अपयश आले असून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवत लढत रोमांचक बनवली आहे.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ
लोकसभा निवडणुकीतमाघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी २ उमेदवारांनी माघार घेतली. मात्र भाजपमध्ये असलेले डॉ सुहास नटावदकर यांचा उमेदवारी अर्ज कायम असल्याने ही लढत तिहेरी झाली आहे. या मतदारसंघात भाजपकडून डॉ हिना गावित आणि काँग्रेसकडून के सी पाडवी यांच्यात मुख्य लढत होणार आहे.
पालघर लोकसभा मतदारसंघ
पालघर लोकसभेकरिता उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. तर निवडणूक चिन्ह वाटपाची वेळ संध्याकाळ 6 वाजेपर्यंत होती. मात्र बहुजन महापार्टीचे उमेदवार चेतन पाटील यांच्यावर एबी फॉर्ममध्ये खाडाखोड करून उमेदवारी अर्ज दाखल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज ही बाद करण्यात आला. आता पालघरमध्ये शिवसेनेचे राजेंद्र गावित आणि बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांच्या मुख्य लढत होईल.
ठाणे लोकसभा मतदारसंघ
ठाणे लोकसभा मतदारसंघात 25 पैकी दोन उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली. यामुळे आता 23 उमेदवार रिंगणात आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आनंद परांजपे आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांच्यात मुख्य लढत असणार आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघ
नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे विरुद्ध समीर भुजबळ मुख्य सामना रंगणार असला तरी भाजपचे बंडखोर उमेदवार माणिकराव कोकाटे ये देखील निवडणूक मैदानात आहेत. कोकाटे याचं बंड शमविण्यात पक्षाला अपयश आलं आहे. नाशिकमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष कोकाटे यांच्यात प्रमुख लढत असणार आहे.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघ
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात तिहेरी सामना रंगणार आहे. भाजपच्या डॉ भारती पवार , राष्ट्रवादीचे धनराज महाले आणि माकपचे जे पी गावीत हे तीन उमेदवार रिंगणात असल्याने चुरस निर्माण झाली आहे. दिंडोरी मतदारसंघात माघारीनंतर 8 उमेदवार रिंगणात आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघ
धुळे मतदारसंघात वंचित आघाडीमुळे काँग्रेसला तर अनिल गोटेंमुळे भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. भाजपकडून सुभाष भामरे तर काँग्रेसने कुणाल पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपचे बंडखोर अनिल गोटे यांनी देखील मैदानात उडी घेतल्याने ही लढत चुरशीची बनली आहे.
शिरुर लोकसभा मतदारसंघ
शिरुर लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे राज्याचे लक्ष लागून आहे. शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे यांच्याशी होत आहे. या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष आहे. शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर खासदारकीची निवडणूक लढवणारे अमोल कोल्हे काही महिन्यांपूर्वीपर्यंत शिवसेनेत होते.
मावळ लोकसभा मतदारसंघ
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांच्यात 'कांटे की टक्कर' आहे. कोकणातील तीन विधानसभेचे मतदारसंघ असलेल्या मावळ मतदारसंघ यावेळी सुरुवातीपासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून आघाडीचे उमेदवार पार्थ पवार निवडणूक लढवत आहे. ही निवडणूक पवार कुटुंबासाठी प्रतिष्ठेची झाली आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघ
भिवंडी लोकसभा मतदारसंघातून सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांच्यासह काँग्रेसचे 2014 चे उमेदवार विश्वनाथ पाटील आणि योगेश कथोरे यांनी माघार घेतली आहे. भिंवडी लोकसभेत 15 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या कपिल पाटील यांच्या विरोधात माजी आमदार सुरेश टावरे काँग्रेसकडून लढत असून ही लढत अटीतटीची मानली जात आहे. त्यातच शिवसेना जिल्हा परिषद सदस्य सुरेश म्हात्रे आणि काँग्रेसचे विश्वनाथ पाटील यांनीदेखील बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 2009 मध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या सुरेश टावरे यांनी विजय नोंदविला होता. मात्र, 2014 मध्ये सेना-भाजप युतीने भिवंडी काबीज केले होते.
कल्याण लोकसभा मतदारसंघ
कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी 32 उमेदवारांपैकी चार जणांनी अर्ज मागे घेतले. यामुळे आता 28 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. शिवसेनेच्या डॉ. श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांच्यातच मुख्य लढत आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून डॉ. देवेंद्र सिंग, ज्योतिराम सरोदे, देवेंद्र सिंग आणि संदेश इंगळे या चार उमेदवारांनी माघार घेतली आहे.