Lok Saha Elections Result 2024: लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल (Lok Sabha Election 2024 Result) आता समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं (NDA) बहुमताचा आकडा गाठल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा मोदीच (PM Modi) विराजमान होणार, हे आता जवळपास निश्चित झालं आहे. अशातच सलग तिसऱ्यांदा मोदी भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार आहे. अशातच आता एनडीए सरकारच्या शपथविधीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. एनडीए सरकारचा शपथविधी 9 जून रोजी होणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. दरम्यान, राष्ट्रपती भवनाकडून एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. या निवेदनानुसार, बुधवारी 5 जून ते 9 जून या कालावधीत राष्ट्रपती भवनाचं सर्किट - 1 सर्वसामान्यांसाठी बंद राहणार आहे. यावेळी राष्ट्रपती भवनात नव्या सरकारच्या शपथविधीची तयारी करण्यात येणार आहे.
देशातील लोकसभेच्या 542 जागांसाठी मंगळवारी 4 जून रोजी मतमोजणी सुरू झाली. सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीएनं आपली आघाडी कायम ठेवली होती. मात्र, नंतर विरोधकांच्या इंडिया आघाडीनं जोरदार मुसंडी मारली. त्यानंतर एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. 2019 च्या तुलनेत भाजपच्या जागांमध्ये मोठी घट पाहायला मिळाली.
5 जून ते 9 जून राष्ट्रपती भवन सर्वसामान्यांसाठी बंद
नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याबाबत राष्ट्रपती भवनानं माहिती दिली आहे. राष्ट्रपती भवनानं एक निवेदन जारी केलं आहे. या निवेदनात म्हटलं आहे की, नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी समारंभाच्या तयारीमुळे, राष्ट्रपती भवन (सर्किट-1) 5 ते 9 जून 2024 पर्यंत सर्वसामान्यांसाठी बंद राहील. त्यामुळे आता लवकरच एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा पार पडेल, असं बोललं जात आहे.
भाजपला 'या' राज्यांमध्ये मोठं नुकसान
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, एनडीए आघाडी 290 हून अधिक जागांवर आघाडीवर असून, त्यापैकी एकटा भाजप 240 जागांवर आघाडीवर आहे. तर इंडिया आघाडी 230 जागांवर आघाडीवर आहे. यामध्ये काँग्रेसनं 100 जागांवर आघाडी कायम ठेवली आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपचं सर्वाधिक नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं आहे. 2019 च्या तुलनेत येथे भाजपच्या जागांमध्ये मोठी घट पाहायला मिळाली. या राज्यांमध्ये इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट असलेले पक्ष आघाडीवर आहेत.
एनडीएच्या विजयावर पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या विजयाबद्दल पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेचे आभार मानले आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशातील जनतेनं सलग तिसऱ्यांदा एनडीएवर विश्वास व्यक्त केला आहे. भारताच्या इतिहासातील हा अभूतपूर्व क्षण आहे. या प्रेम आणि आशीर्वादासाठी मी माझ्या कुटुंबियांना प्रणाम करतो. मी देशवासियांना खात्री देतो की, त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही नवीन ऊर्जा, नवीन उत्साह आणि नवीन संकल्प घेऊन पुढे जाऊ. मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या समर्पण आणि अथक परिश्रमाबद्दल त्यांचं अभिनंदन करतो.