Nashik Lok Sabha Election Result 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघात ठाकरे विरुद्ध शिंदे सेनेमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत अखेर ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांनीच बाजी मारली. शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांची हॅटट्रिक यामुळे हुकली. दोन वेळा खासदारकी मिळविलेल्या हेमंत गोडसे यांचा तब्बल एक लाख साठ हजारांच्या फरकाने अतिशय मानहानिकारक पराभव झाला. हट्टाने घेतलेल्या उमेदवारीनंतर निर्माण झालेली नाराजी आणि अॅन्टीइन्कम्बन्सीचा मोठा फटका गोडसे यांना बसला.
दहा वर्षांत मतदारसंघात भरीव काम न झाल्याने मोठी नाराजी त्यांच्याबद्दल होती. मात्र, केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुत्राने उमेदवारीची घोषणा केल्यामुळे तिकिटासाठी अडून बसलेल्या गोडसेंना राजाभाऊ वाजे यांनी मोठ्या फरकाने पराभूत केले.
हेमंत गोडसेंच्या पराभवाची कारणे काय?
- मतदारसंघात जनसंपर्क दिसून आला नाही.
- उमेदवारीसाठी वारंवार मुंबईवारी करावी लागली.
- भाजपकडून गोडसेंच्या नावाबाबत नकारात्मक भूमिका, अहवालाच्या नावाखाली संभ्रम.
- महायुतीत अगदी शेवटच्या कशी मिळालेली उमेदवारी.
- 10 वर्षात मतदारसंघात भरीव कामे केली नाहीत, अशा मतदारांची भावना
- शिंदे गटाचे संघटन कमी पडले.
- मित्र पक्षांकडून म्हणावी तशी मदत मिळाली नाही.
- भुजबळ नाराजी भोवल्याची चर्चा.
- राष्ट्रवादी अजित पवार गटाचा प्रचारात सक्रीय सहभाग दिसून आला नाही.
- नाशिक शहरात गोडसेंच्या प्रचारासाठी एकही मोठी सभा नाही. राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंनी अनंत कान्हेरे मैदान येथे मोठी सभा घेतली. या सभेचाही फटका बसल्याची मतदारसंघात चर्चा
- जुने शिवसैनिक ठाकरे गटात असल्याने फटका.
- बंडखोरी लोकांना आवडली नसल्याची भावना.
विधानसभा मतदारसंघ निहाय उमेदवारांना मिळालेली मते
सिन्नर विधानसभा
राजाभाऊ वाजे - 1 लाख 59 हजार 492
हेमंत गोडसे - 31 हजार 254
देवळाली विधानसभा
राजाभाऊ वाजे - 81 हजार 200
हेमंत गोडसे - 54 हजार 64
नाशिक पूर्व विधानसभा
राजाभाऊ वाजे - 89 हजार911
हेमंत गोडसे - 1 लाख 311
नाशिक मध्य विधानसभा
राजाभाऊ वाजे - 88 हजार 712
हेमंत गोडसे - 84 हजार 906
नाशिक पश्चिम विधानसभा
राजाभाऊ वाजे - 93 हजार 617
हेमंत गोडसे - 1 लाख 24 हजार 827
इगतपुरी विधानसभा
राजाभाऊ वाजे - 1 लाख 1 हजार 585
हेमंत गोडसे - 58 हजार 52
एकूण मतदान
राजाभाऊ वाजे - 6 लाख 14 हजार 517
हेमंत गोडसे - 4 लाख 53 हजार 414
ग्रामीण भागात अशी झाली लढत
सिन्नर हे राजाभाऊ वाजे यांचे होमपीच आहे, या मतदारसंघात राजाभाऊ वाजे यांना 1 लाख 28 हजार 238 मतांची निर्णयाक आघाडी मिळाली. अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे इथले आमदार आहे सिन्नरचा लीड वाढत असतानाच हेमंत गोडसे यांच्या समोर इगतपुरी मतदार संघातील लीड तोडण्याचे आव्हान उभे राहिले इगतपुरी मतदारसंघात 43 हजारांची आघाडी उभी राहिली. काँग्रेस हिरामण खोसकर इथले आमदार आहेत. सिन्नरला लागून असणाऱ्या देवळाली मतदारसंघातही हेमंत गोडसेंना पीछेहाट बघायला मिळाली. 27 हजार 136 मतांची आघाडी राजाभाऊ वाजेंना मिळाली. अजित पवार गटाच्या सरोज अहिरे इथल्या आमदार आहेत.
शहरी भागात अशी झाली लढत
ग्रामिण भागातील राजाभाऊ वाजेंचा लीड नाशिक शहरातील भाजप आमदार राहुल ढिकले यांच्या नाशिक पूर्व मतदार संघात तोडण्याचा प्रयत्न महायुतीने केला. हेमंत गोडसेंना नाशिक पूर्व मतदार संघात 10 हजार 400 मतांची आघाडी मिळाली. नाशिक पूर्वनंतर नाशिक पश्चिम मतदारसंघात हेमंत गोडसे यांना 31 हजार 210 मतांची आघाडी मिळाली. मात्र या दोन्ही मतदारसंघातील आघाडी सिन्नर, इगतपुरीचा लीड तोडू शकली नाही. भाजपच्या सीमा हिरे नाशिक पश्चिमच्या आमदार आहेत. शहरातील या दोन्ही मतदारसंघात हेंमत गोडसे यांना आघाडी मिळाली मात्र भाजपाच्या देवयानी फरांदे आमदार असणाऱ्या नाशिकमध्य मतदार संघात चुरशीची लढाई झाली. अल्पसंख्याक मतांच्या जोरावर राजाभाऊ वाजे यांचं पारडे पुन्हा जड झाले. भाजपच्या तीनही आमदाराच्या मतदार संघात हेंमत गोडसे यांना बऱ्यापैकी मते मिळाली असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँगेसच्या ताब्यात असणाऱ्या मतदार संघात हेमंत गोडसेंना फटका बसला आणि सरतेशेवटी त्यांना पराभवाला समोरे जावे लागले.
आणखी वाचा