Loksabha Election Result 2024: केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी लोकांनी मतदान केले. तसेच राज्यातही महायुतीला जनता बहुमत देणार, हे उद्या समोर येईल. उद्या निकाल लागणार असल्याने एक्झिट पोल्सवर आता बोलण्यापेक्षा आपण थोडी निकालाची प्रतिक्षा करु, असं महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. उद्या मतमोजणी असल्याने आता राजकीय मंडळी देव दर्शन करताना दिसत असून आज विखे पाटील कुटुंबासह हेलिकॉप्टरने विठ्ठल दर्शनासाठी आले होते. येथूनच ते तुळजापूरकडे रवाना झाले.
राज्यात 40 पेक्षा जास्त जागा महायुतीला मिळणार-
देशात 350 पेक्षा जास्त जागा एनडीएला मिळत असून देशातील जनतेने पुन्हा तिसऱ्यांदा मोदी याना पंतप्रधान करण्यासाठी मतदान केल्याचे विखे यांनी सांगितले . तसेच राज्यातही किमान 40 पेक्षा जास्त जागा मिळतील असे संकेतही दिले. नगर जिल्ह्यातील त्यांचे पुत्र सुजय विखे यांच्यासह शिर्डी अशा दोन्ही जागा मोठ्या फरकाने जिंकणार असल्याचा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला. अजित पवार हे महायुतीतील नेते असून त्यांनी मनापासून राज्यभर महायुतीचा प्रचार केला आहे . अजित पवार गटाने महायुतीचे काम केले नाही, असे वक्तव्ये करून त्यांचेकडे संशयाचे वातावरण निर्माण करणे चुकीचे असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले .
मनोज जरांगेंचा निवडणुकीवर फारसा परिणाम नाही-
उद्याच निकाल लागत असल्याने कोणाला फायदा झाला आणि कोणाला तोटा झाला हे समोर येणार असल्याचेही विखे यांनी सांगितले. मनोज जरंगे यांचा या निवडणुकीवर फारसा परिणाम झाला असे वाटत नाही, असा दावा विखे पाटील यांनी केला. मराठा आरक्षणासाठी आम्हीसुद्धा पुष्कळ काम केले आहे. त्यामुळे असे कोणी म्हणत असतील कि आम्हीच फक्त आरक्षणासाठी लढा देतोय. तर मराठा आरक्षणासाठी सुरुवातीला आंदोलन सुरु झाले. 58 मोर्चे निघाले त्यावेळी या आंदोलनातील कोणीच नव्हते, असे वक्तव्य देखील विखे पाटील यांनी करीत जरांगे व त्यांचे समर्थकांना टोला लगावला.
मविआ आणि महायुतीमध्ये रस्सीखेच
महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली होती. यानंतर शिवसेनेतील शिंदे गट आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गट भाजपसोबत गेला होता. त्यामुळे भाजपच्या नेतृत्त्वाखालील महायुतीला मोठे यश मिळेल, असा अंदाज होता. मात्र, एक्झिट पोलची आकडेवारी पाहता लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. एबीपी माझा-सी वोटरच्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात दिसली रस्सीखेच. महायुती व मविआला निम्म्या निम्म्या जागांचा अंदाज. महायुतीला 24 तर मविआला 23 जागांचा अंदाज. भाजप 17, तर शिंदे गटाला 6 जागांचा अंदाज. अजित पवार गटाला फक्त एक जागेवर विजय शक्य. मविआमध्ये काँग्रेसला 8, ठाकरे गटाला 9 जागांचा अंदाज. शरद पवार गटाला 6 जागा मिळण्याचा अंदाज. महाराष्ट्रात महायुतीसह भाजपला मोठा तोटा शक्य. 2019 ला 23 जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी 17 जागांवरच विजय मिळण्याची शक्यता. शिंदे गटाचा आकडाही 13 वरुन 6 पर्यंत घसरण्याची शक्यता आहे.