Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता सत्तास्थापना आणि मंत्रिमंडळाच्या चर्चा रंगल्या आहेत. नव्या सरकारमध्ये कोण कोण कॅबिनेट मंत्रि असतील, याच्या चर्चा सुरु आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात दोन उपमुख्यमंत्री राहण्याची शक्यता आहे. नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाला उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्याशिवाय प्रत्येक चार खासदारामध्ये एक मंत्रिपद असा फॉर्मुलाही ठरल्याची माहिती समोर आलेली आहे. 


लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election Result 2024) भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे सरकार स्थापन करताना नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांची मदत घ्यावी लागत आहे. एनडीएचं सरकार स्थापन होण्याआधी मंत्रिपदाची वाटाघाची सुरु झाली. एनडीए सरकारच्या मंत्रीमंडळाचे संभाव्य सूत्र एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. अर्थ, गृह, संरक्षण आणि परराष्ट्र ही चार सर्वात महत्त्वाची खाती भाजप स्वतःकडे ठेवणार आहे. प्रत्येकी 4 खासदारांच्या मागे एक कॅबिनेट मंत्रीपद देण्याचं ठरलं आहे, अशी माहिती मिळतेय. चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपीचे 16 खासदार आहेत, त्यामुळे त्यांना चार कॅबिनेट मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे, तर 12 खासदार असलेल्या नितीश कुमारांच्या पक्षाला तीन मंत्रिपदं दिली जाण्याची चिन्हं आहेत. मात्र नेमकी कुठली खाती घटकपक्षांना देणार हे मात्र अजून कळू शकलेलं नाही. तर दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद दिलं जाईल असं समजतंय. 


नव्या मंत्रिमंडळात नितीश कुमार यांना तीन,चिराग पासवान आणि जिंतनराम मांझी यांच्या पक्षाला एक, चंदाबाबू नायडू यांच्या पक्षाला चार कॅबिनेट मंत्रीपदं मिळणार. शिवसेनेला एक कॅबिनेट, एक राज्यमंत्रीपद तर राष्ट्रवादीला एक मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 जून रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती भवनात शपथविधीच्या तयारीला वेग आलाय. विदेशी पाहुण्यांना शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलेय. नवी दिल्लीत भाजप खासदारांची मुख्यालयात बैठक पार पडणार आहे. त्यामध्ये पंतप्रधान मोदींची संसदीय पक्षाच्या नेतेपदी  निवड होणार आहे. पण त्याआधी कोणतं मंत्रिपद कुणाला? मित्रपक्षाला कोणती खाती द्यायची? हे भाजपकडून स्पष्ट केले जाणार आहे. त्यासाठी एनडीएच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाले आहेत.    


जेडीयूची डिमांड


बिहार राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा. त्यासोबतच चार कॅबिनेट मंत्रिपदे आणि चार राज्यमंत्रीपद मिळावी.  


टीडीपीला काय हवे. 


चंद्राबाबू नायडू यांनीही आंध्रप्रदेश राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी केली आहे.त्याशिवाय पाच मंत्रालय मागितली आहेत.


 शिवसेनेचं काय ?


एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने तीन कॅनिबेट मंत्रिपदे आणि दोन राज्यमंत्रीपद मागितली आहे. चिराग पासवान याच्या एलजेपी पार्टीने एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रीपदे मागितली आहेत. जीतनराम मांझी यांनी एक राज्यमंत्रीपद मागितले आहे.